कोल्हापूर : टाकाळा परिसरातील एस. व्ही. एन्टरप्रायझेसचा मालक सिद्धार्थ राजू वाझे (वय २६, रा. शाहू मिल कॉलनी, राजारामपुरी, कोल्हापूर) हा १६ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. अखेर सोमवारी (दि. २७) सकाळी तो सुखरूप परतला. आर्थिक अडचणीतून आलेल्या नैराश्यामुळे निघून गेल्याची कबुली त्याने राजारामपुरी पोलिसांकडे दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, टाकाळा परिसरातील एस. व्ही. एन्टरप्रायझेस शेअर ट्रेडिंग कंपनीचा प्रमुख सिद्धार्थ वाझे हा ऑफिसला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. १६ नोव्हेंबरच्या रात्री तो परत न आल्याने वडिलांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. त्याने दोन्ही मोबाइल ऑफिसमध्येच ठेवल्यामुळे आणि नातेवाईकांसह मित्रांना संपर्क साधत नसल्याने त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. अखेर सिद्धार्थ सोमवारी सकाळी घरी परतला. आर्थिक अडचणीतून आलेल्या नैराश्यामुळे निघून गेल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. कोल्हापुरातून रेल्वेने बाहेर पडल्यानंतर तो वाराणसी, काशी, पुणे, तुळजापूर, अक्कलकोट येथे राहिला. मुलगा परत आल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.
कोल्हापुरातील बेपत्ता सिद्धार्थ वाझे परतला, नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला
By उद्धव गोडसे | Published: November 27, 2023 7:04 PM