लोकमत न्यूज नेटवर्क
हेरले : निसर्ग आपल्याला व सर्व वन्यजिवांना शुद्ध पाणी, हवा व अन्य विविध प्रकारचे फायदे देतो. ही बाब लॉकडाऊनच्या काळात मानव समाजाला प्रकर्षाने जाणवली.
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेच्या निसर्गमय कुशीत सिद्धोबा डोंगर परिसर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव असा हा डोंगर आहे की, २० ते ३० फुटापर्यंत खोल काळी माती आहे. हा डोंगर अनेक वृक्षांच्या हिरवाईने नटला आहे.
हेरले (ता. हातकणंगले) येथील सिद्धोबा डोंगर निसर्गाच्या हिरवाईने नटला आहे. गावच्या उत्तर बाजूस विस्तीर्ण असा साधारण २०० हेक्टर सिद्धोबा डोंगर पश्चिमेकडून पूर्वेस पसरला आहे. यामध्ये सामाजिक वनीकरणाचे क्षेत्र व महार सामुदायिक सोसायटीचे क्षेत्र आहे. लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांपासून ते आबालवृद्धांच्या या सर्वच मंडळींना या डोंगर रांगांनी निसर्गातील विविध प्रकारची माहिती घेण्यासाठी आकर्षित केले. निसर्गातील विविध वृक्ष, फुले, पक्षी, ओढे, नाले पाहण्यासाठी व ट्रेकिंगसाठी डोंगर परिसरामध्ये भटकंती चालू आहे. नोकरवर्ग व तरुण मंडळींनी खास रविवारी सुट्टीच्या दिवशी पहाटे या डोंगरावर ट्रेकिंग करण्यास सुरुवात करून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम हाती घेतले. या डोंगर परिसरात गावातील तरुण मंडळींनी जवळपास विविध प्रकारची ११०० झाडे लावून त्यांचे संवर्धन केले आहे. यामुळे परिसरातील सर्व तरुणपिढीचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जीवसृष्टी वाचविण्यासाठी निसर्गाची मानवाला अत्यंत गरज आहे ही बाब अधोरेखित झाली आहे.
सिद्धोबा डोंगरावर सन २०१७ व २०१८ मध्ये जिल्हा नियोजन समितीमधून २७ लाखांची कामे झाली आहेत. सन २०१९ व २०२० साली महाराष्ट्र शासनाने सिद्धोबा डोंगर ‘क’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे डोंगरावरील विविध विकासकामांना चालना मिळाली. डोंगराकडे जाणारे रस्ते व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
हेरले गावातील सर्व तरुण मंडळांच्या वतीने प्रत्येक रविवारी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गर्दी होते. हेरले येथील वृक्ष संवर्धन ग्रुपच्या वतीने डोंगरावर जांभूळ, वड, पिंपळ, बहवा व औषधी वनस्पतीची, आदी प्रकारची ११०० झाडे लावण्यात आली आहेत.
प्रतिक्रीया १)
सिद्धोबा डोंगर परिसर पर्यटनस्थळ होण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे. - डॉ. पद्माराणी राजेश पाटील
सभापती महिला व बालकल्याण जि. प.
२) राहुल शेटे, उपसरपंच, हेरले
हेरले व माले गावच्या वेशीवर सिद्धोबा डोंगर उताऱ्यावर ब्रह्मझरा आहे. या ठिकाणी मोठा पाझर तलाव बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. डोंगरावर ९ ते १० ठिकाणी पर्यटकांसाठी ‘‘हॅप्पी स्पॉट’’ तयार करणार आहोत. हेरले ग्रामपंचायत व विविध संघटनांच्या माध्यमातून डोंगरावर औषध व आर्थिक उत्पन्न देणारे फळ झाडे लावण्याचा संकल्प आहे.