राधानगरी-गुडाळवाडी मार्गावर अपुरे काम व बाजुपट्ट्यांच्या देखभालीअभावी प्रवास धोकादायक झाला आहे. पिरळ फाट्याजवळ मोठ्या उतारावरील वळणावर झुडपे वाढल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. गुडाळवाडीजवळील एक किलोमीटर अंतरातील काम वर्षभरापूर्वीपासून रेंगाळले आहे.
दहा किलोमीटरचा हा रस्ता तीन वर्षांपूर्वी दीर्घकाळच्या मागणीनंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर झाला. याची मुख्य जिल्हा मार्ग म्हणून दर्जोंन्नती झाल्याने अडचण दूर झाली. दोन वर्षांपूर्वी या रस्त्यासाठी एक कोटी निधी मिळाला. त्यातून राधानगरी ते करंजफेण या अंतरात चांगल्या दर्जाचा रस्ता झाला. मात्र, यावेळी गुडाळवाडीकडील एक किलोमीटरचा भाग वगळण्यात आला.
या भागात आता खड्ड्याची चाळण निर्माण झाली आहे. या मार्गाचे गेल्या वर्षी काम मंजूर झाल्याचे सांगण्यात येत होते. ठेकेदाराने काम सुरू करेपर्यंत कोरोनाचे संकट आल्याने ते रेंगाळले. मोठ्या प्रमाणात सुरू असलेली ऊस वाहतूक धोकादायकरीत्या सुरू आहे. राधानगरी ते पिरळ फाटा या मार्गात मोठ्या उतारावर रस्त्याला खेटून झुडपे वाढली आहेत. येथे मोठे वळण आहे. समोरून आलेले वाहन जवळ आल्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे बाजूपट्ट्या साफसफाई करण्याची गरज आहे.
फोटो ओळ - राधानगरी-गुडाळवाडी मार्गावर पिरळ फाट्याजवळ मोठ्या उतारावरील वळणावर झुडपे वाढल्याने धोकादायक स्थिती आहे. (फोटो : संजय पारकर)