:पूररेषा आखण्याचे काम सुरू
शिरोळ / जयसिंगपूर
शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांच्या पुराचे पाणी संथपणे ओसरू लागले आहे. अंकली पुलाजवळ कृष्णेच्या पातळीत घट होत असली तरी राजापूर बंधाऱ्यावर कृष्णेची व कुरूंदवाड पुलाजवळ पंचगंगेचे पाणी इंचाइंचाने कमी होत आहे. त्यामुळे तालुक्यातील २४ गावांचा धोका अजूनही कायम आहे.
शिरोळ तालुक्यातील ४३ गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.
प्रत्येक वर्षाला महापूर येणार असेल तर आम्ही शेती कशी पिकवायची, नदी परिसरात वसलेल्या गावांचे पुनर्वसन होणार का, पूर ओसरल्यानंतर मोडलेला संसार कसा उभारायचा, अशा अनेक प्रश्नांच्या विचारात छावणीतील पूरग्रस्त दिवस मोजत आहेत. ४४ छावण्यांमध्ये १५ हजार पूरग्रस्त नागरिक वास्तव्यास आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. पुराचा विळखा सैल होत असला तरी पाणी कमी होण्याचे प्रमाण संथ आहे. दरम्यान, पूरबाधित गावातील पूररेषा आखण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
चाऱ्याची सोय
शिरोळ तालुक्यातील पूर बाधित गावांमधील जनावरांसाठी शरद साखर कारखाना,
दत्त साखर कारखाना, गुरुदत्त शुगर्स या कारखान्यांनी चारा (वैरणीची) व्यवस्था केलेली आहे. बाधित गावातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.