म्हाकवे : लिंगनूर-कापशीसह परिसरातील नागरिकांनी निपाणी-देवगड रस्त्याच्या अर्धवट कामाबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अखेर या रस्त्याला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. वारंवार बोलवूनही अधिकारी टाळाटाळ करत होते. दोन दिवसांत आवश्यक त्याठिकाणी डांबरीकरण करून नागरिकांची तात्पुरती गैरसोय दूर करण्यात येईल. तसेच, पावसाळ्यानंतर संपूर्ण रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे अभिवचनही देण्यात आले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. यामध्ये कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलिसांनी शिष्टाई केल्याने आंदोलक शांत झाले आहेत.
लिंगनूर येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारी, विजेचे खांब, तारा तसेच, गावच्या पाणी योजनेच्या खराब झालेल्या पाईप बदलून त्याची योग्य ती व्यवस्था करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिले. या वेळी कागलचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक वाकचौर, सार्वजनिक बांधकामचे कनिष्ठ अभियंता अमित पाटील, रणधीर पाटील, डी. की. शिंदे तसेच, कॉ. शिवाजी मगदूम, सरपंच स्वप्निल कांबळे, मयूर आवळेकर, कॉ. शिवाजी मेथे, कॉ. हरिदास पोवार, कॉ. विलास भोसले, कॉ. नामदेव भोसले, कॉ. संदेश जाधव, कॉ. ज्ञानेश्वर पडळकर, कॉ. प्रवीण जाधव, नंदकुमार किल्लेदार, बाळासाहेब कामते, तुषार किल्लेदार, संदीप घाटगे, प्रशांत चौगुले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : ०१म्हाकवे आंदोलन
लिंगनूर-कापशी येथे नुकत्याच झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत जाब विचारताना किसान सभेचे कार्यकर्ते.
छाया-तुषार किल्लेदार