भीमगोंडा देसाईकोल्हापूर : दोन, तीन वर्षे पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने कागल तालुक्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. याउलट राधानगरी तालुक्यातील पाणी पातळी नीचांकी गेली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडील भूजल पातळी अहवालावरून असे चित्र समोर आले आहे.पावसाचे पाणी भूगर्भात चांगल्या प्रकारे मुरल्यानंतर भूजल पाणी पातळीत वाढ होते. यासाठी कृषी, सामाजिक वनिकरण, वनविभागातर्फे माथा ते पायथा या सूत्रानुसार पाणी मुरण्यासाठीचे उपचार जमिनीवर केले जातात. पाच वर्षात सरासरी जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे, असे भूजल सर्वेक्षण प्रशासनाचे म्हणणे आहे.
९९ निरीक्षण विहिरींची तपासली पातळी ग्रामपंचायतमधील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्यातील ९९ विहिरीतील पाणी पातळीचे निरीक्षण जानेवारी २०२२ अखेर करण्यात आले. निरीक्षण घेताना जमीन पातळीपासून विहिरीतील पाणी पातळी यंदा किती आहे. त्याच विहिरीची पाणी पातळी गेल्या पाच वर्षात किती होती, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.कागल तालुक्यात सर्वात वर पाणीजिल्ह्यात सर्वात वर पाणी पातळी कागल तालुक्यातील आहे. या तालुक्यातील उंदरवाडी, बोरवडे, कुरुकली, मुरगूड, गलगले या पाणलोट क्षेत्रात सर्वात वर पाणी आहे.राधानगरीची स्थिती चिंताजनकराधानगरी तालुक्यात सर्वात खाली पाणी पातळी गेली आहे. या तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. पण जमिनीत पाणी कमी मुरते आणि वाहते अधिक अशी स्थिती आहे.
भूगर्भातील पाणी पातळी विविध ठिकाणी भिन्न असते. पण पाणी पातळी वाढण्यासाठी विहीर पुनरभरणाच्या उपाययोजना वाढविण्याची गरज आहे. शहरात कॉंक्रिटीकरण वाढल्याने पाणी कमी मुरते. यामुळे शहराभोवतची पाणी पातळी खालावत असते. -उदय गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ
जास्तीत जास्त कुटुंबांनी छतावरील पाणी साठवून जमिनीत मुरवावे. विंधनविहिरीचे पुनरभरण करावे. पावसाचे पाणी अडवून मुरविण्यासाठीच्या उपाययोजना केल्या पाहिजे. - अनिल चौगुले, पर्यावरण तज्ज्ञ
कोणत्या तालुक्याची भूजल पातळी किती? (मीटरमध्ये)
तालुका | जानेवारी २०१७ ते २०२१ मधील सरासरी पाणी पातळी | जानेवारी २०२२ |
आजरा | ३.१० | २.९० |
भुदरगड | ३.८२ | ३.७५ |
चंदगड | ६.७१ | ६.६४ |
गडहिंग्लज | २.७६ | २.८० |
गगनबावडा | ५.९८ | ५.८५ |
हातकणंगले | ३.६७ | ३.५६ |
कागल | १.७७ | १.३९ |
करवीर | २.६४ | २.६१ |
पन्हाळा | ३.१२ | ३.२५ |
राधानगरी | २.२७ | २.२८ |
शाहूवाडी | ४.३६ | ४.३२ |
शिरोळ | ३.५९ | ३.५१ |