कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी व्यूहरचना आखणीस गती दिली असून भाजप-ताराराणी आघाडीसोबत जनसुराज्य शक्ती पक्षानेही यावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून असे प्रयत्न होत असून लवकरच त्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच अनुषंगाने रविवारी आमदार विनय कोरे यांची भेट घेतली आहे. महापालिकेसह गोकुळ व जिल्हा परिषदेतही कोरे भाजपसोबतच राहावेत, असे प्रयत्न आहेत.
राज्यासह कोल्हापुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप नको हा एकमेव प्रमुख मुद्दा घेऊन कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असे तीन पक्ष एकत्र आले असताना दुसरीकडे भाजपने देखील कंबर कसली आहे. भाजपसोबत छत्रपती ताराराणी आघाडी आहेच शिवाय आता नव्याने जनसुराज्य शक्ती पक्षालाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार कोरे यांच्याशी ‘सावकार, तुम्हाला महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागतंय,’ असे सांगितल्याची चर्चा आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री हा प्रयत्न करणाऱ्यापैकी काहीजण कोरे यांना भेटायला वारणानगरला गेले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावतीने हे लोक त्यांना भेटायला गेले होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष आज, बुधवारी कोल्हापुरात असून ते महापालिकेच्या घडामोडीत व्यस्त राहणार आहेत. काहींच्या घरी चहा, नाष्टाला जाऊन निवडणकीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहेत. कोणत्या प्रभागातून कोणाला पक्षाची उमेवारी द्यावी याचाही ते अंदाज घेणार आहेत. माजी खासदार धनंजय महाडिकसुद्धा या प्रक्रियेत सक्रिय झाले आहेत.
प्रा. जयंत पाटील सक्रिय
या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीसोबत जनसुराज्य शक्ती पक्षाने यावे याकरिता महापालिका राजकारणात माहीर असलेले प्रा. जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत असलेले त्यांचे मतभेद मिटले आहेत. चंद्रकांत पाटील व महाडिक यांच्या सांगण्यावरून प्रा. पाटील पुढे आले आहेत. भाजप-ताराराणी आघाडीतर्फे उमेदवार ठरविणे, राजकीय पक्षांची मोट बांधणे, प्रचार यंत्रणा राबिवणे, उमेदवारांना जेथे अडचणी असतील तेथे मदत करणे अशा वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.