गणपती कोळी -- कुरुंदवाड -शिरोळ तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या चारही नद्यांमुळे पाण्याबाबत राज्यात सुखी तालुका मानला जातो़ मात्र, राज्यातील दुष्काळाची झळ या तालुक्यालाही सोसावी लागत असून, नद्या कोरड्या पडू लागल्याने शेतातील पिके वाळत आहेत़ कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने बंधाऱ्याच्या पूर्व भागातील तालुक्याच्या तसेच चिकोडी, अथणी तालुक्यांतील नद्या कोरड्या पडल्या असून, या पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे़ श्रिोळ तालुक्यातून कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा या बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे पाण्याची कमतरता कधीच भासली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व न समजल्याने शेतीच्या अतिरिक्त पाण्यामुळे पिकेही तहान विसरून गेली़ गतवर्षी झालेला अत्यल्प पाऊस व त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने यंदा हिवाळ्यापासूनच नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत़ अन् पाणीटंचाईची जाणीव शेतकरी, नागरिकांना होऊ लागली़धरणातील पाणीसाठा मर्यादित राहिल्याने किमान पाणी वापरता यावा यासाठी पाटबंधारे विभागाने शेतीसाठी काहीकाळ उपसाबंदी चालू केली आहे़ पिकांना गरजेपूर्वीच पाणी देण्याची सवय लागलेल्या शेतकऱ्यांना पिकांचे पाणी महिना दीड महिना लांबल्याने पिके वाळू लागली आहेत़ या भागातील शेतकऱ्यांची शेतीवरच आर्थिक उलाढाल असल्याने व पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल होऊ लागली आहे़पंचगंगा नदीवर इचलकरंजी बंधाऱ्याला घालण्यात आलेले बरगे काढण्यास पाटबंधारे अधिकाऱ्यांना इचलकरंजी लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे या नदीवरील शिरोळ बंधाऱ्यापर्यंत असलेल्या सुमारे पंचवीसहून अधिक गावांतून संताप व्यक्त करून तोडफोडीचा इशाराही देण्यात आला़कृष्णा नदीवर राजापूर येथे महाराष्ट्र हद्दीतील शेवटचा बंधारा आहे़ या बंधाऱ्याला बरगे घालून फुगट्याद्वारे तालुक्यातील शिरोळ बंधाऱ्यापर्यंतच्या सुमारे पंचवीस गावांना पाणीपुरवठा केला जातो़ या बंधाऱ्यात ठराविक उंचीपर्यंत पाणी ठेवून उर्वरित पाणी बंधाऱ्याच्या पूर्व भागातील नदीत सोडून कर्नाटकाला दिले जाते़यंदा पाणीपातळी खालावल्याने व बंधाऱ्यातील गळती थांबविल्याने कर्नाटकातील चिकोडी, अथणी तालुक्यांतील नदी कोरडी पडली आहे़ चार दिवसांपूर्वी दुधगंगा नदीतून एक टी़एम़सी़ पाणी सोडल्यामुळे तात्पुरते जीवदान मिळाले आहे़ मात्र, पुन्हा नदी कोरडी पडणार असून कर्नाटकातील लोक राजापूर बंधाऱ्यावर लक्ष्य साधणार आहेत. २००३ साली अशाच पाणी समस्येतून रात्रीतून जे़ सी़ बी़यंत्राच्या साहाय्याने कर्नाटक भागातील शेतकऱ्यांनी बंधाऱ्याचे बरगे काढून पाणी सोडले होते़ तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून पाण्याविना पिके वाळू लागल्याने संतापाचा उद्रेक केव्हाही होऊन पाण्यासाठी संघर्ष होण्याची शक्यता आहे़ राजापूर बंधाऱ्याचे नियंत्रण सांगली पाटबंधारा विभागाकडे असून याची वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे़ वाळू उपसामुळे पाणी प्रश्न गंभीरराजापूर बंधाऱ्यातून सोडलेले पाणी खिद्रापूर गावाला वळसा घालून राजापूरवाडी, टाकळीपर्यंत जाते़ मात्र खिद्रापूर येथे दुधगंगा नदीतून कर्नाटक हद्दीतील वाळू उपसा केल्याने व नदीपात्र उथळ झाल्याने कृष्णा नदीतील पाणी कर्नाटकाच्या दिशेने जाते़ याचा परिणाम खिद्रापूर, राजापूरवाडी, टाकळी गावाला बसत असून नदी कोरडी पडल्याने टाकळी येथे गेल्या चार दिवसांपासून ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद आहे़ त्यामुळे पिके तर वाळू लागली आहेत़ पिण्याच्या पाण्याचीही कमतरता भासू लागली आहे़
पाण्यावरून संघर्ष पेटण्याची चिन्हे
By admin | Published: April 22, 2016 12:29 AM