कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केलेल्या डेक्कन सायक्लोथॉन स्पर्धेच्या खुल्या गटात रविवारी सकाळी झालेल्या १२० किलोमीटर शर्यतीमध्ये सांगलीच्या दिलीप माने याने प्रथम क्रमांक पटकाविला. माने याने शिवाजी विद्यापीठ ते संकेश्वर ते परत शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी असे अंतर सर्वांत कमी वेळेत पूर्ण केले.
यासोबतच विविध गटांत हेमंत लोहार, प्रतीक्षा चौगुले, नितीन नारगोलकर, उज्ज्वल ठाणेकर, श्रुती कुंभोजे, सुमित्रा खानविलकर, सुधीर नकाते (सर्व कोल्हापूर); तर रमा जाधव, शिल्पा दाते (सांगली), अंजली भालिंगे (पुणे) या सायकलपटूंनीही आपापल्या गटात बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला.स्पर्धेतील निकाल असे, १२० कि.मी. (शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी ते संकेश्वर, पुन्हा शिवाजी विद्यापीठ) - पुरुषांमध्ये दिलीप माने (सांगली), सुदर्शन देवडीकर (कोल्हापूर), प्रकाश ओलेकर (सांगली), वेदान्त हेलर्नेकर (पुणे), अॅरॉन केन (लंडन, सध्या रा. पुणे), फ्लॅक नेल्सन (पल्लीतुरा, केरळ), अभिनात मुरली (केरळ), केवल्य सनमुद्रा (पुणे).५० कि.मी. (पुरुष)- शिवाजी विद्यापीठ ते अप्पाचीवाडी ते पुन्हा शिवाजी विद्यापीठ)- हेमंत लोहार (कोल्हापूर), किरण बंडगर (सांगली), सिद्धेश पाटील (कोल्हापूर); तर महिलांमध्ये १६ ते ३६ वयोगट - प्रतीक्षा चौगुले (कोल्हापूर), निशाकुमारी यादव (सांगली), मानवी पाटील (गडहिंग्लज).३६ ते ५० वयोगट- रमा जाधव (सांगली), साजीद सय्यद (सांगली), जॉर्ज थॉमस (कºहाड). ५० वर्षांवरील गट - नितीन नारगोलकर (कोल्हापूर), राम बेळगावकर (कोल्हापूर), जीवदास शहा (सातारा). महिलांमध्ये शिल्पा दाते (सांगली), नेहा टिकम (पुणे), सुचित्रा काटे (कोल्हापूर). ५० वर्षांवरील- अंजली भालिंगे (पुणे).२० कि.मी. - शिवाजी विद्यापीठ ते पंचतारांकित एमआयडीसी, पुन्हा शिवाजी विद्यापीठ - १५ ते ३० वयोगट- श्रुती कुंभोजे (साजणी). ३० ते ५० वयोगट- सुमित्रा विश्वविजय खानविलकर (कोल्हापूर), आरती संघवी (कोल्हापूर).स्पर्धेचे उद्घाटन के. एस. ए.चे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, कोल्हापूर जिल्हा सायकलिंग असोसिएशनेच अध्यक्ष विजय जाधव, डेक्कन स्पोर्टस्चे अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष जयेश कदम, वैभव बेळगावकर, अभिषेक मोहिते, अतुल पोवार, अमर धामणे, संजय चव्हाण, प्रशांत काटे, समीर चौगुले, राजू लिंग्रस, आदी उपस्थित होते.स्पर्धेचा बक्षीस समारंभ महापौर सरिता मोरे व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विजय जाधव, विश्वविजय खानविलकर, उदय पाटील, जयेश कदम, वैभव बेळगावकर, अभिषेक मोहिते, आदी उपस्थित होते.पर्यावरणाचा समतोल असलेले विनाखर्चाचे वाहन म्हणून सायकल हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. याशिवाय सर्वोत्तम व्यायाम म्हणूनही सायकलिंगकडे पाहिले जाते. त्यामुळे सायकलिंगचा टक्का शहरासह जिल्ह्यात वाढू लागला आहे. त्याचा परिपाक म्हणून चेन्नई, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा, बंगलोर, महाराष्ट्रसह कोल्हापुरातील सायकलपटूंनीही या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
विशेष म्हणजे उद्घाटक म्हणून लाभलेले मालोजीराजे छत्रपती व त्यांचे मेहुणे विश्वविजय खानविलकर, उद्योजक रवींद्र पाटील-सडोलीकर, करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भाग घेऊन ५० कि.मी. अंतराची स्पर्धा पूर्ण केली. याशिवाय लंडनमधील अॅरॉन केन हा परदेशी पाहुणाही या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याने १२० कि.मी. स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविला. पंच म्हणून असोसिएशनचे अध्यक्ष विजय जाधव यांनी काम पाहिले. स्पर्धा मार्गात चार रुग्णवाहिकांसह आठ डॉक्टर व १२० स्वयंसेवक कार्यरत होते. स्पर्धा संपल्यानंतर सायकलपटूंना फिजिओथेरपी, स्ट्रेचिंगच्या प्रात्यक्षिकासंह मार्गदर्शन करण्यात आले.