संदीप खवळे - कोल्हापूर शिखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंदसिंगांच्या सैन्यांबरोबर १७ व्या शतकात महाराष्ट्रात आलेले शीख सैनिक इथेच राहिले. नांदेड हा त्यांचा केंद्रबिंदू राहिला तरी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतही शीख बांधव हळूहळू स्थलांतरित झाले. कोल्हापुरातील शीख बांधवांच्या रहिवासाला सुमारे ६० वर्षांचा इतिहास आहे. कोल्हापूर शहरातील विचारे माळ, शेंडा पार्क, राजेंद्रनगर, तसेच आसपासच्या परिसरात शिखांचे वास्तव्य असून, त्यांची लोकसंख्या सुमारे हजाराच्या घरात आहे. लोखंडापासून अनेक वस्तू तयार करण्याचे कसब आणि कष्ट ही कोल्हापुरातील शीख समाजाची वैशिष्ट्ये आहेत. कोल्हापुरात प्रामुख्याने नांदेड आणि सोलापूर येथून आलेल्या शीख बांधवांचा समावेश आहे. सुमारे ६० वर्षांपूर्वी शीख बांधव कोल्हापुरात आले आहेत. कोल्हापुरात स्थायिक झालेले हे शीख बांधव शीख समाजातील ‘शिकलगार’ या प्रवर्गातील आहेत. गुरू गोविंदसिंग यांच्या सैन्यात या समाजाचे पूर्वज तलवारी तयार करण्याचे काम करीत होते. गुरू गोविंदसिंग यांनी नांदेड येथे समाधी घेतल्यानंतर हे सैनिक पंजाबला गेलेच नाहीत. सुरुवातीला ते नांदेड आणि त्या परिसरात राहिले. त्यानंतर ते हळूहळू महाराष्ट्राच्या इतर भागांत आले. जन्मजात शस्त्रे तयार करण्याची कला अवगत असलेला हा समाज कोल्हापूर हा शेतीप्रधान जिल्हा असल्यामुळे येथे १९६० च्या दशकात आला. हा समाज सध्या लोखंडापासून लागणाऱ्या विविध वस्तू तयार करतो. तसेच फॅब्रिकेशन व्यवसायामध्येही शीख बांधवांनी चांगली गती घेतली. अनेक शीख बांधवांनी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये स्वत:चे फॅब्रिकेशनचे कारखाने सुरू केले आहेत. कमी जागा, भांडवलाची मर्यादा असूनही गेल्या ६० वर्षांत या समाजाने कष्टाच्या जोरावर लोखंडापासून घमेली, कढई, शेगड्या, झारी तयार करण्याच्या व्यवसायांत बस्तान बसविले आहे. हार्डवेअर, फॅब्रिकेशन तसेच हॉटेल व्यवसायामध्ये शीख समाजाने आपले पाय रोवले आहेत. महाराष्ट्रात येऊन सुमारे सव्वातीनशे वर्षे झाली तरी पंजाबी प्रथा मात्र या शीख बांधवांनी आजपर्यंत जोपासल्या आहेत. कोल्हापुरातील शीख बांधव वैसाखी, गुरुनानक आणि गुरू गोविंदसिंग जयंती उत्साहाने साजरी करतात. या सणांबरोबरच दिवाळीही साजरी करतात. होळी साजरी करण्यासाठी कोल्हापुरातील शीख बांधव नांदेड येथील गुरुद्वाराला जातात. ‘गुरू ग्रंथसाहिब’ हा शीख बांधवांचा धर्मग्रंथ आहे. दर रविवारी प्रार्थनेसाठी घरातील एका छोटेखानी गुरुद्वारामध्ये शीख बांधव प्रार्थनेसाठी एकत्र जमतात. गुरुद्वारासाठी जागा द्यावी, अशी या बांधवांची मागणी आहे. शीख समाजात शाकाहाराला विशेष महत्त्व आहे. मक्याची भाकरी हा त्यांचा आवडता खाद्यपदार्थ. गुरुद्वाराच्या परिसरात मांसाहार केला जात नाही. विवाहसमारंभ धुमधडाक्यात साजरे केले जातात. लग्नसमारंभ दोन दिवसांचा असतो. यातील पहिल्या दिवशी हळदी, तर दुसऱ्या दिवशी विवाह होतो. केस, कडे, कृपाण, कचेरा आणि कंगवा ही शीख समाजाच्या वेशभूषेची खासियत आहे. महिला सलवार-कमीज परिधान करतात, असे पवित्रसिंग दुधानी यांनी सांगितले. पंजाबी भाषेचा वापर घरी केला जातो. पंजाबीबरोबरच मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषा त्यांना अवगत आहेत. पंजाबमधील मूळ माहीत नसले तरी फिरण्यासाठी का असेना; पण आम्ही पंजाबला जातो. पंजाबमधील आमच्या पाऊलखुणा शोधण्याच्या प्रयत्न करतो. होळीदिवशी नांदेड येथील गुरुद्वाराला दरवर्षी मोठा मेळा भरतो. त्यासाठी आम्ही दरवर्षी जातो. या ठिकाणी महाराष्ट्राबरोबरच देशभरातील शीख बांधव येतात. इथे आल्यानंतर आमचा आनंद द्विगुणित होतो. मुलांना पंजाबी भाषा शिकता यावी, यासाठी पंजाबी शिक्षकांना आम्ही निमंत्रित करतो, अशी माहिती संग्रामसिंग कलानी यांनी दिली. कष्ट करून खाणे हीच शीख बांधवांची खासियत आहे. पत्र्यापासून शेगडी, कढई, झारी, आदी वस्तू तयार करण्यासाठी भल्या पहाटेच शीख बांधव सुरुवात करतात. आजही विचारेमाळ परिसरात गेल्यास शीख वसाहतीमध्ये आपल्याला हे चित्र दिसते. भर उन्हातही लोखंडापासून विविध वस्तू तयार करण्यासाठी हा समाज राबत असतो. गुरुद्वारासमोर भिकारी तुम्हाला कधीही दिसणार नाही. कामचुकार शीख तुम्हाला कधीही दिसणार नाही, असा विश्वास येथील शीख बांधव व्यक्त करतात. संगीतविषयी आवड जपताना शीख बांधव पंजाबी गाण्यांना प्राधान्य देतात. आजही त्यांच्या मोबाईल रिंगटोनवर पंजाबी गाण्यांची रेलचेल पाहायला मिळते. त्याद्वारे भांगडा नृत्य, पंजाबी गाण्यांची आवड जोपासली जाते. प्रामाणिकपणा, कष्टांवर शीख बांधवाचा भर असतो. शीख धर्मीयांना व्यसनाधीनता, मूर्तिपूजा, व्यक्तिपूजा, जात-पात मान्य नाही. बाजारात फायबरची घमेली आणि पाट्या आल्यापासून शीख बांधवांच्या या व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला भटकंती झाल्यानंतर व्यवसायात स्थिर होऊन चाळीस वर्षे होतात न होतात तोच फायबरच्या वस्तूंशी स्पर्धा करावी लागत असल्यामुळे आर्थिक गणिते चुकत आहेत, अशी खंतही येथील शीख बांधव व्यक्त करतात.पंजाबी भाषेशी, तिथल्या वातावरणाशी अनेक वर्षे संपर्क नसल्यामुळे मुलांना पंजाबी भाषा येत नाही. त्यामुळे पंजाबी शाळेची गरज आहे. कोल्हापूरवर शीख बांधवाचे इतके प्रेम आहे की, कोल्हापूरहून कामानिमित्त परगावी गेलो तर कधी एकदा पुन्हा कोल्हापुरात येऊ, अशी मनाची घालमेल होते, अशी भावना हार्डवेअर व्यावसायिक अमरजितसिंग व्यक्त करताना दिसतात.
अपार कष्टाने शीख समाजाची भटकंतीवर मात
By admin | Published: April 19, 2015 11:45 PM