मूक आंदोलनावेळी सर्वच आमदार, खासदार, मंत्री यांनी यावे, त्यांनी आपली भूमिका ठोसपणे मांडावी. त्यांनीच आता बोलायचे आहे. निवडणुकीवेळी मते मागायला आमच्याकडे येताच ना... मग आता आमच्या आंदोलनातही सहभागी व्हायला या. जर का आला नाहीत तर मात्र आम्ही तुम्हाला फोकस करू, तुमचे फ्लेक्स लावू, असा इशाराच खासदार संभाजीराजे यांनी यावेळी दिला.
ॲडव्होकेट जनरल सोबत बैठक
बैठकीत ॲड. बाबा इंदूलकर व प्रा. जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणातील अडसर ठरलेले कायदेशीर मुद्दे विशद केले आणि यापुढे काय करायला पाहिजे हे स्पष्ट केले. त्याचा उल्लेख करत खासदार संभाजीराजे यांनी यासंदर्भात लवकरच जस्टिस भोसले, राज्य सरकारचे ॲड. जनरल कुंभकोणी, माजी ॲड. जनरल थोरात यांच्याशी वैयक्तिक बैठक लावण्याची जबाबदारी माझी असेल, या बैठकीला मी स्वत: उपस्थित असेन असे सांगितले.
तर छत्रपती घराण्यात जन्म झाला सांगणे चुकीचे होईल
मी मराठा समाजाच्या हिताची भूमिका घेऊन या आंदोलनात उतरलो आहे. गरीब समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे. मला पुढे दहा वर्षांनी कोणी बोलता कामा नये की, तुमची भूमिका पक्षपातीपणाची होती. एका पक्षाची, एका वर्गाची घेतली. हे मी माझ्या जन्मात कदापि होऊ देणार नाही. तसे केले तर माझा जन्म छत्रपती घरण्यात झाला हे सांगणं चुकीचं होईल, असे खासदार संभाजीराजे म्हणाले.