कोल्हापूर : कोल्हापुरातील जयप्रभा व शालिनी स्टुडिओच्या अस्तित्वासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळच्यावतीने गुरुवारी (दि. १ जुलै) सकाळी १० वाजता खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभ येथे मूक ठिय्या आंदाेलन करण्यात येणार आहे. तर शनिवारी (दि. ३) सायंकाळी ७ वाजता बिंदू चौकात मेणबत्ती लावून निषेध करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
शालिनी स्टुडिओच्या जागेवर बांधकाम करण्याची परवानगी विकासकाला देण्याचा आदेश शासनाने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर महापालिकेला दिला आहे. दुसरीकडे गेली कित्येक वर्षे जयप्रभा स्टुडिओ बंद असून, तोदेखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यात गुरुवारी मूक आंदोलन व शनिवारी मेणबत्ती लावून शासनाचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी संचालक बाळा जाधव, सतीश बिडकर, अर्जुन नलवडे, अजय कुरणे, राहुल राजशेखर, इम्तियाज बारगीर, अरुण भोसले-चोपदार, अमर मोरे, स्मिता सावंत-मांढरे, बबिता काकडे, संग्राम भालकर, बबन बिरंजे उपस्थित होते.
--