गडहिंग्लज : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याकडून थकीत फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटीसाठी सेवानिवृत्त कामगारांनी येथील प्रांतकचेरीसमोर दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी बेमुदत धरणे आंदोलन केले. दुपारी प्रांतकचेरीपासून शहरातील प्रमुख मार्गावरून कामगारांनी आपल्या मागणीसाठी मूक मोर्चा काढला.
दरम्यान, संध्याकाळी सेवानिवृत्त कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची जिल्हा बँकेत भेट घेतली. यावेळी कंपनीच्या कार्यकाळात सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची देय रक्कम देण्याची सूचना आपण ब्रिस्कच्या व्यवस्थापनाला करू, अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली, अशी माहिती संघटनेचे प्रमुख चंद्रकांत बंदी यांनी दिली.
शिष्टमंडळात, माजी संचालक शिवाजी खोत, सुभाष पाटील, बाळासाहेब मोहिते, बबन पाटील, सुरेश पाटील, लक्ष्मण देवार्डे, बाळासाहेब लोंढे, बाबूराव पाटील, रणजित देसाई यांचा समावेश होता.
* फोटो ओळी : गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी आपल्या मागणीसाठी गडहिंग्लज शहरातील प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढला. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : १५०१२०२१-गड-१५