लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी मूल्यवर्धित शेतीचे प्रयोग करणे गरजेचे आहेत. शेतकऱ्यांचा विद्यापीठाशी जास्तीत जास्त संबंध यावा, त्यांना अधिक माहिती देता यावी यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. रेशीम शेतीचे क्षेत्र राज्यात वाढत चाललेले आहे. या शेतीच्या अनुषंगाने अगदी तुतूचे झाड ते रेशीम धागा यासंदर्भात मार्गदर्शन करणारा प्लँट(प्रकल्प) शिवाजी विद्यापीठात उभा करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.
लाटवडे (ता. हातकणंगले) येथील नरसिंह सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शेतकरी स्नेह मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संथाध्यक्ष प्रा. तानाजी स्वामी होते. विशेष म्हणजे संस्थेचे पाटकरी, पंपमन, सचिव यांचा सत्कार कुलगुरूंच्या हस्ते यावेळी करण्यात आला. यावेळी प्रा. तानाजी स्वामी, प्राचार्य व्ही. बी. सायनाकर, इरिगेशन ऑफिसर एस. ए. कुलकर्णी, प्रा. विलास पाटील, प्रा. दत्ता पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमास वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव पाटील, सरपंच संभाजी पवार, उपसरपंच बाळासाहेब भोपळे, ग्रामपंचायत सदस्य दिनकर पाटील, संभाजी पाटील, एम. आर. पाटील, बशीर मुल्ला, एन. वाय. पाटील, के. आर. पाटील, बाळासाहेब पाटील, पद्मा बहेनजी, उपस्थित होते. सचिव निवास पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष महादेव पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळी : लाटवडे येथे नरसिंह सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या स्नेह मेळाव्यात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा सत्कार प्रा. तानाजी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एस. ए. कुलकर्णी, दत्ता पाटील, अशोक पाटील, व्ही. बी. सायनाकर, उत्तमराव पाटील, संभाजी पवार उपस्थित होते. (छाया-सृष्टी फोटो)