यंत्रमाग व्यवसायातील वहीफणीचे काम करणारे राजेंद्र व मंगल फराकटे यांची कन्या सुरेखा हिने गुवाहाटी (आसाम) येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उंचउडीमध्ये रौप्यपदक मिळवून त्यांचा सन्मान वाढवला आहे.
सुरेखा फराकटे ही कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी, पहाटे लवकर उठून शाळेच्या मैदानावर दररोज सकाळी व संध्याकाळी सततचा सराव, चिकाटी, जिद्द व मेहनत घेते. त्यामुळेच तिला रौप्य पदकापर्यंतचे यश मिळवता आले. क्रीडाशिक्षक सुभाष माने यांचे तिला मार्गदर्शन लाभले. ऑलिम्पिक पदकाचे तिचे ध्येय आहे, त्यासाठी ती कष्ट घेत आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील स्पर्धेसाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे.
सुरेखाने दोन वर्षांत अनेक आंतर जिल्हा व राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला आहे. विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला होता. आतापर्यंत चारवेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली आहे. पुणे येथील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उंचउडीमध्ये प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळविले. त्यामुळे तिची गुवाहाटी ( आसाम) येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली. या राष्ट्रीय स्पर्धेत चौदा वर्षांखालील वयोगटांत तिने १.४० मीटर उंचउडी मारून रौप्यपदक पटकावले. तिची २४ फेब्रुवारीला रायपूर (छत्तीसगड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
फोटो क्रमांक - 20210216-1, 20210216-2
फोटो ओळ - गुवाहाटी (आसाम) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उंचउडीमध्ये रौप्यपदक मिळविलेली सुरेखा फराकटे