कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात ‘मोक्या’तील सातारच्या कैद्याच्या अंगझडीत प्रशासनाला मोबाइलचे सीमकार्ड मिळाले. स्वप्नील मोहन काकडे (रा. सातारा) असे संशयित कैद्याचे नाव आहे. त्याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आला. हे सीमकार्ड कारागृहात कधीपासून होते, त्याचा वापर किती कैद्यांनी केला, याची माहिती घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातारा येथील मोकाअंतर्गत कारवाईतील संशयित स्वप्नील काकडे सध्या कळंबा कारागृहात आहे. शनिवारी सकाळी त्याला मोका न्यायालयात हजर करण्यासाठी नेत होते. त्यासाठी त्याला कपडा गोडावूनमध्ये कपडे बदलण्यास पाठविले. सातारा न्यायालयात नेण्यासाठी त्याला कारागृहातून बाहेर काढताना प्रवेशद्वारावर शिपाई समाधान हत्तीकर (रा. संभाजीनगर, मूळ- इचलकरंजी) यांनी त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांना त्याच्या जीन्स पॅन्टच्या खिशात पिवळे एक सीम कार्ड सापडले. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. संशयित काकडेवर गुन्हा दाखल केला.