समीर देशपांडेकोल्हापूर : दिव्यांगांसाठीच्या पारंपरिक योजनांना फाटा देत यंदा कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने बाराही तालुक्यांतील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगांना एकाच वेळी अनुदान देण्याची योजना आखण्यात आली आहे. जिल्ह्यातील २५ हजार दिव्यांगांना प्रत्येकी ३०० रुपये देण्यात येणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही योजना मांडली असून, त्याची आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पातील पाच टक्के निधी हा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेला असतो. गेली काही वर्षे या निधीतून दिव्यांगांना कुक्कुटपालन, शेती अवजारे पुरवणे, दुचाकी पुरवणे, संगणक, लॅपटॉप पुरवणे, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, जयपूर फूट, पांढरी काठी यासारखी साहाय्यकारी साधने पुरवली जात होती.परंतु मर्यादित दिव्यांग बंधू-भगिनींना याचा लाभ होत होता. तसेच यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता, जिल्हा परिषद सदस्यांची शिफारसपत्रे, पंचायत समितीला प्रस्ताव देणे, तो जिल्हा परिषदेला येऊन मंजूर होणे ही प्रक्रिया मोठी आहे. काहीवेळा एका आर्थिक वर्षातील साधने दुसऱ्या वर्षी मिळाल्याचीही उदाहरणे आहेत.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी याबाबतच्या झालेल्या बैठकीत पारंपरिक सर्व योजनांना फाटा देऊन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असलेल्या सर्वांना सानुग्रह अनुदान द्यावे, अशी सूचना मांडली. ती समाजकल्याण समितीनेही मान्य केली. त्यानुसार आता जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या २५ हजार दिव्यांग बंधू-भगिनींना एकाच वेळी प्रत्येकी ३०० रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे मर्यादितांना होणारा हा लाभ सर्वच दिव्यांगांना होणार आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी वैयक्तिक योजनेच्या माध्यमातून मर्यादितांना लाभ देण्यापेक्षा यावेळी अधिकाधिक दिव्यांगांना लाभ देण्याबाबत ही योजना मांडली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीने यासाठी ७५ लाख २७ हजार रुपयांची तरतूद केली आहे. निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करून ३०० रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील.स्वाती सासने,सभापती, समाजकल्याण समिती, जिल्हा परिषद कोल्हापूर