दोडामार्ग : दोडामार्ग-भेडशी राज्य मार्गावरील आंबेली येथील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा एसटी, डंपर, कार यांच्यात धडक होऊन तिहेरी अपघात झाला. या अपघातात ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
एसटी चालक व्ही. पी. बुवा (बेळगाव), वाहक मालिकजान शेख (तुर्केवाडी, चंदगड) तर डंपरचालक कल्पेश धरणे (रा. भेडशी) हे तिघे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे पाठविण्यात आले.दोडामार्गे चंदगडला जाणारी एसटी बस आंबेली येथील अवघड वळणावर आली असता भेडशीहून दोडामार्गच्या दिशेने भरधाव वेगात येणारा डंपर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती की या धडकेत एसटी बस मागे सरकून गटारात कलंडली.
एसटी बस मागून असलेली चारचाकी या अपघातात एसटी बसच्या खाली सापडली. मात्र मारूती गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. तर एसटी बसमधील चालक व्ही. पी. बुवा, वाहक मलिकजान शेख, प्रवासी सावित्री कदम (पाळये), साटेली भेडशी महसूल मंडळ अधिकारी सचिन गोरे तर डंपरचालक कल्पेश धरणे असे ५ जण जखमी झाले. एसटी बसमध्ये प्रवासी कमी असल्याने जखमींची संख्या कमी झाली.या अपघाताची घटना समजताच तालुक्यातील अनेकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेत सहकार्य केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, पंचायत समिती सदस्य बाळा नाईक, वैभव इनामदार, संजय सातार्डेकर, देवा शेटकर, शंकर देसाई, गोपाळ गवस, अरविंद राऊत, प्रवीण गवस, सेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी व अन्य ग्रामस्थांनी सहकार्य केले.
यावेळी म्हापसेकर यांच्या गाडीतून जखमींना दोडामार्ग येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याच वळणावर तीन अपघातदोडामार्ग-भेडशी मार्गावरील आंबेली नुतनवाडी येथील याच धोकादायक वळणावर गेल्यावर्षी एसटी बस व डंपर तर दोन एसटी बस असे दोन अपघात झाले होते. त्याचप्रमाणे यावर्षी एसटी बस व डंपर यांच्यात समोरासमोर अपघात घडला असून त्याच वळणावरील हा तिसरा अपघात असल्याने आंबेली येथील हे धोकादायक वळण असल्याचे चर्चेत आले आहे. आंबेली नुतनवाडी येथील वळणावरील दुतर्फा झाडी साफ केली असतानाही हा अपघात घडला. त्यामुळे या अपघाताबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.