सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यात सुरू केलेल्या संजीवन पोषण अभियानाचे चांगले परिणाम दिसू लागले असून, कणकवली, वेंगुर्ला, वैभववाडी, देवगड या चार तालुक्यांमधील ० ते ५ वयोगटातील ९० टक्केपेक्षा जास्त बालके सर्वसाधारण श्रेणीत आली आहेत. ही बाब निश्चितच समाधानकारक असल्याचे नूतन महिला व बालविकास सभापती रत्नप्रभा वळंजू यांनी सांगितले. उर्वरित चार तालुक्यांनीही जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची सभा सभापती रत्नप्रभा वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी सदस्या वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, कल्पिता मुंज, समिती सचिव तसेच जिल्हा बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यात नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या संजीवन पोषण अभियानाचा आढावा यावेळी घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ म्हणाले की, या अभियानाचे चांगले परिणाम सध्या जिल्ह्यात दिसू लागले आहेत. या अभियानासाठी ग्रामपंचायत व समाजसेवा संस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांनी ० ते ५ वयोगटातील ९० टक्के बालके सर्वसाधारण श्रेणीत आणली आहेत. या अभियानाबाबत सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, मालवण या चार तालुक्यांमध्ये विशेष प्रयत्न केले गेले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.दोडामार्ग तालुक्यातील ४० अंगणवाड्यांच्या परसबागेत भाजीची लागवड करण्यात आली आहे. हीच भाजी मुलांना आहारात देण्यात येत असल्याचे बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. सभापती रत्नप्रभा वळंजू यांनी दोडामार्ग तालुक्याचा हा आदर्श अन्य तालुक्यांनी घ्यावा, असे सांगितले. संजीवन पोषण अभियानात कणकवली तालुक्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली असून, ९२.३५ टक्के बालके सर्वसाधारण गटामध्ये आली आहेत. या पाठोपाठ देवगड ९२.१९ टक्के, वैभववाडी ९१.४२ टक्के, वेंगुर्ला ९०.७४ टक्के अशाप्रकारे सर्वसाधारण गटामध्ये बालके आली आहेत. मालवण तालुक्यामध्ये ८९.९० टक्के एवढे काम झाले आहे. या पाठोपाठ कुडाळ ८८.३० टक्के, सावंतवाडी ८७.४२ टक्के काम झाले असून, दोडामार्ग तालुक्यात ८३.८८ टक्के अभियानाचे काम झाले आहे. जिल्ह्यात ० ते ५ वयोगटामध्ये ३७ हजार ५२५ बालके असून, यातील ३३ हजार ८७४ बालके सर्वसाधारण श्रेणीत आली आहेत. (प्रतिनिधी)योजना लोकाभिमुख करणारनूतन महिला व बालविकास सभापती रत्नप्रभा वळंजू यांची ही पहिलीच सभा होती. महिला व बालविकास विभागामध्ये जेवढ्या योजना आहेत, त्या लोकाभिमुख करून प्राप्त निधी सर्व योजनांवर १०० टक्के खर्च करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग कुपोषणमुक्त करा
By admin | Published: February 11, 2016 9:33 PM