फोंडाघाट : रक्ताची नाती दुरावतात. आपलेच लोक आपल्याच लोकांना दूर लोटतात. अशावेळी आधार देण्याची, माणुसकी जपण्याची भूमिका जीवन आनंद संस्था पार पाडते, असे उद्गार फोंडाघाट महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी काढले. ते महाविद्यालयातील महिला विकास कक्षातर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.ते म्हणाले, समाजात जे अनेक गंभीर प्रश्न आहेत त्यापैकी महत्त्वाचा प्रश्न मनोरुग्णांचा, निराधारांचा, अनाथांचा आहे. या घटकांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यासाठीच जीवन आनंदसारख्या संस्था महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. विद्या मोदी यांनी केले. समाजात आणि विद्यार्थ्यांमध्ये निराधारांविषयी जागृती व्हावी हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब, उदय कामत, आशिष कांबळे यांचा डॉ. कामत यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी संदीप परब यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने आपला अनुभव कथन करून जीवन आनंद संस्थेचे कार्य कसे चालते, ते स्पष्ट केले. तरुणाईच्या उत्साहाबरोबर ज्येष्ठांचा अनुभव देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून वृद्धांची काळजी घ्या. सेवाभाव जोपासा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. जगदीश राणे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. एस. आर. रायबोले, प्रा. डी. बी. ताडेराव, प्रा. एस. एम. आखाडे, डॉ. आर. बी. पाटील, प्रा. व्ही. व्ही. पाटील, प्रा. मयुरी सावंत, प्रा. सारीका राणे, प्रा. रूपाली माने, प्रा. डॉ. डाफळे आदी शिक्षक आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.