सिंधुदुर्ग : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीचे उमेदवार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मित्र पक्षांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केला. दरम्यान, कोकण भवन येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या वतीने अॅड. निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला.आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबरोबरच भाजपचे ठाणे विभागीय अध्यक्ष व खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, किसन कथोरे, नरेंद्र पवार, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, प्रशांत ठाकूर, महेश चौघुले, जगदीश मुळीक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार रामनाथ मोते आदी मान्यवर नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येमुळे कोकण भवनचा परिसर गर्दीमुळे फुलून गेला होता.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे अधिकृत उमेदवार अॅड. निरंजन डावखरे. सोबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, प्रसाद लाड व अन्य.
कोकण पदवीधर मतदारसंघ हा पूर्वीपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या सहा वर्षांपासून मतदारसंघात अॅड. निरंजन डावखरे यांनी संपर्क ठेवला असून, विविध विकासकामे केली आहेत. त्यांचा विविध संस्थांबरोबर संबंध आला आहे. त्याचबरोबर शिक्षक परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आम्ही पदवीधर मतदारांपर्यंत पोचत आहोत. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.विशेषतः अॅड. डावखरे यांच्याबद्दल मतदारांमध्ये विश्वास आहे. विधान परिषदेचे दिवंगत उपसभापती वसंत डावखरे यांच्या माध्यमातून डावखरेंचा सर्वत्र मित्र परिवार आहे. त्याचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे ते बहूमताने जिंकून येतील, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
अॅड. डावखरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) भाजप, रिपब्लिकन पक्षासह सर्व मित्र पक्षांचा पाठिंबा मिळेल. समाजातील अनेक घटकांनी खुलेपणाने पाठिंबा दिला आहे. तर काही जणांनी छुप्या पद्धतीने पाठिंबा दिला. त्यामुळे अॅड. निरंजन डावखरे यांना विजय मिळेल, असा विश्वास राज्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.गेल्या सहा वर्षांत शिक्षक, पदवीधर, कृषी पदवीधरांबरोबरच समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. सहा वर्षांत केलेली कामे मतदारांसमोर ठेवून संवाद साधत आहोत, अशी माहिती अॅड. निरंजन डावखरे यांनी पत्रकारांना दिली.
भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची उपस्थितीकोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपच्या कोकणातील वरिष्ठ नेत्यांनी गर्दी केली होती. ठाणे-कोकण विभाग संघटनमंत्री सतीश धोंड, माजी आमदार विनय नातू, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार, ठाणे शहरचे अध्यक्ष संदीप लेले, उल्हासनगरचे कुमार आयलानी आदींची उपस्थिती होती. या नेत्यांबरोबरच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.