मालवण : समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना दिशा दाखविण्यासाठी बंदर विभागाच्यावतीने बसविण्यात येणाऱ्या बोया (लोखंडी पिंपे) बसविण्याची कार्यवाही गेल्या सात आठ महिन्यात झालेली नाही. शिवाय गंजलेल्या बोया बंदर कार्यालयासमोरील जागेत गेली काही वर्षे पडून असल्याने ती जागा विनावापर आहे. त्यामुळे या बोया तत्काळ हटविण्यात याव्यात, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.दरम्यान, आमदार नाईक यांनी दिलेल्या सूचनेनुसार बंदर बिभागाच्यावतीने विनावापर गंजलेल्या अवस्थेतील बोया दुसऱ्या दिवशी हटविण्याची कार्यवाही करताना कोणी अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.आमदार वैभव नाईक यांनी बंदर कार्यालयास भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, पंकज सादये, स्वप्नील आचरेकर, मंगेश सावंत, किरण वाळके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बंदर कार्यालयासमोर गेली काही वर्षे टाकलेल्या बोया हटविण्याची कार्यवाही का झाली नाही अशी विचारणा नाईक यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. यावर मेरीटाईम बोर्डाकडून त्याबाबतची कार्यवाही केली जात असल्याचे सांगण्यात आले.
गेली अनेक वर्षे गंजलेल्या बोया बंदर कार्यालयासमोर टाकलेल्या असल्याने मोठ्या प्रमाणात जागा वाया जात आहे. त्यामुळे त्या बोया तत्काळ हटविण्याची कार्यवाही करावी अशा सूचना आमदार नाईक यांनी दिल्या.
समुद्र्रात टाकण्यात येणाऱ्या बोयांची निविदा प्रक्रिया होऊन वर्षभराचा कालावधी उलटला मात्र अद्यापही समुद्र्रात बोया टाकलेल्या नाहीत. बोयांचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून कार्यवाही झाली नसल्याचे बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.