सिंंधुदुर्गनगरी : पोलिस प्रशासनाने आंदोलनकर्त्या मराठा बांधवांना प्रतिबंधात्मक स्वरूपाच्या कारवाईच्या नोटिसा बजावूनदेखील मंंगळवारी महामार्गावर ठिकठिकाणी मराठी बांधवांनी चक्का जाम आंदोलन केले. दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ व कणकवली येथे जमलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इतर ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी गनिमीकाव्यामार्फत वेताळबांबर्डे, कसाल, कणकवली, तरंदळे फाटा या ठिकाणी महामार्गावर टायर पेटविणे, मातीचा ढीग तसेच झाड तोडून टाकल्याने, महामार्ग कित्येक वेळ रोखल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पोलिसांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह १६४ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी राज्यभर मराठा क्रांती मोर्चे काढले होते. मात्र, याची राज्य सरकारने फारशी दखल न घेतल्यामुळे मंगळवारी राज्यभर एकाचवेळी महामार्ग तसेच राज्यमार्ग चक्का जाम करण्याचा एल्गार मराठा समाज समन्वय समितीने केला होता. त्यानुसार मंगळवारी सर्वत्र महामार्ग चक्का जाम आंदोलन छेडण्यात आले.मराठा समाजाने चक्का जाम आंदोलनातील ठिकाणे जाहीर केल्याप्रमाणे सकाळपासूनच आंदोलनकर्ते जमा होत होते. प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात केला होता. जलदकृती दलाचे पथकही घटनास्थळी उपस्थित होते. महामार्ग विस्कळीत होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने काही आंदोलनकर्त्यांना दोन दिवसांपूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ व कणकवली येथे मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते गोळा होऊन महामार्ग चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी लागलीच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांची कार्यपद्धती ओळखून अखेर आंदोलनकर्त्यांनी गनिमी काव्याचा आधार घेत महामार्ग चक्का जाम करण्याचा निर्धारच केला. जाहीर केलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी चक्का जाम न करता महामार्गावर दुसऱ्याच ठिकाणी चक्का जाम करण्यास आंदोलनकर्त्यांना यश आले. कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथे मार्गावर टायर पेटवून आंदोलनकर्त्यांनी खळबळ उडवून दिली. टायर विझवताना धावपळ उडाली. ओरोस-खर्येवाडी येथे महामार्गालगत असणारे भले मोठे झाड तोडून महामार्गावर टाकल्याने महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत महामार्ग मोकळा केला. (प्रतिनिधी)आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न फसलाजिल्ह्यात सध्या मनाई आदेश लागू आहेत. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता आहे. त्यातच आजचे मराठा समाजाचे चक्का जाम आंदोलन होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने बऱ्याच आंदोलनकर्त्यांना कारवाईचे पत्र काढून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी चक्का जाम करत आंदोलन यशस्वी केले. आंदोलनकर्त्यांचा गनिमी कावाआंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे लक्षात येताच उर्वरित आंदोलनकर्त्यांनी गनिमी काव्याचा वापर करून महामार्गावर कसाल पुलाच्या तोंडावरच वाहनाच्या साहाय्याने माती ओतल्याने महामार्ग सुमारे अर्धा तास ठप्प होता. पोलिस फौजफाट्यासह दाखल होत कसाल पोलिसपाटील अनंत कदम यांच्या साहाय्याने रस्त्यावरील मातीचा भला मोठा ढिगारा बाजूला करण्यात आला. ही घटना सकाळी ११.४० च्या सुमारास घडली होती. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपअधीक्षक संध्या गावडे यांच्यासह पोलिस ताफा उपस्थित होता.१६४ आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यातयात कणकवलीतून ३४ आंदोलनकर्त्यांना, दोडामार्ग १०, सावंतवाडी १०, तर कुडाळ येथून ९० आंदोलनकर्त्यांचा समावेश आहे.
सिंधुदुर्गात चक्का जाम!
By admin | Published: January 31, 2017 11:41 PM