आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १९ : विश्वजीत रॉय चौधरी यांचे सरोदवादन आणि प्रियदर्शिनी कुलकर्णी यांच्या गायनातून कोल्हापुरच्या संगीतप्रेमी रसिकांनी पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांंच्या सागितिक स्मृती जागविल्या. गायन समाज देवल क्लब आणि न्यू एज फौंडेशन, पुणे यांच्या सहसंयोजनाने जयपूरअतरोली घराण्याच्या ख्याल गायन परंपरेतील महान कलाकार आणि गवय्यांचे गवई पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या सांगितीक स्मृतिस ही विशेष संगीत सभा समर्पित करण्यात आली होती. विश्वजीत रॉय चौधरी यांनी आपल्या सरोद वादनातून नाद सौंदर्याचे मनोहारी दर्शन घडविले. त्यांनी राग बिहागडा सादर केला. आलाप,जोड आणि झाला यातून तसेच गतीमधून त्यांनी सादर केलेल्या नादमाधुर्य आणि लयकारी अशा दोन्हीतील अनेक श्रवणीय जागांना रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. नादाची तीव्रता कमीअधिक करण्यातील ज्यांच्या कौशल्याची प्रचिती या वादनातून आली. प्रणव मोघे यांनी या नादमाधुर्याला हातभार लागेल अशी तबला साथ केली. या रागानंतर श्रोत्यांच्या आग्रहास्तव त्यांनी रावा नटबिराग, बहार व काफी रागातील धून सादर करुन दोन तास रंगलेल्या या संगीत मैफिलीची सांगता केली. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रातील मैफिलीस संस्थेच्या भांडारकर कलादालनात पुण्याच्या गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी जयपूर अतरोली घराण्याचा खास राग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैन कल्याण रागातील पपीहा न बोले या बंदिशीने सुरुवात केली. आकारयुक्त निकोप आवाजाचा लगाव, रागशुध्दता, राग मांडणीतील नेटकेपणा, आकर्षक बोलताना गुंतागुंतीची चपळ तानक्रिया या जयपूर अतरौली घराण्याची प्रतिज्ञा जपत आपले गायन रंगतदार बनविले. जैन कल्याण रागानंतर त्यांनी वसंती केदार राग सादर केला. प्रियदर्शिनी यांना तबल्यासाठी प्रदीप कुलकर्णी आणि हार्मोनियमवर हरिप्रिया पाटील यांनी साथ केली. दीपप्रज्वलन आणि पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या प्रतिमापूजनाने या विशेष संगीत सभेला प्रारंभ झाला. कलाकारांचा परिचय आणि प्रास्तविक श्रीकांत डिग्रजकर यांनी केले. कलाकारांचे स्वागत अरुण डोंगरे आणि दिलीप चिटणीस यांनी केले. या कार्यक्रमाला पंडित सुधीर पोटे, सुखदा काणे, डॉ. अजित कुलकर्णी, सुबोध गद्रे यांच्यासह कोल्हापुरातील संगीतप्रेमी रसिकांनी हजेरी लावली होती.