कोल्हापूर : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत हवी असल्यास ११२ डायल करा. अवघ्या दहाव्या मिनिटांत पोलीस घटनास्थळी हजर राहतील. राज्यासह प्रत्येक जिल्ह्यात ही लवकरच सुरू होणार आहे. गृह विभागाने सध्या अशाच पद्धतीने आधुनिकतेवर भर देत गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या उपक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास चारचाकी व दुचाकी वाहनांची मोठी फौज दिली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात तत्काळ घटनास्थळी मदतीसाठी ‘सिंघम’ अवतरणार आहे.
राज्यातील पोलीस दलाने आधुनिक यंत्रणेचा वापर करत गुन्हेगारी कमी करण्यावर जास्तीत जास्त भर दिला आहे. ‘११२ डायल’ या नव्या उपक्रमामुळे पोलीस यंत्रणा सक्षम होणार आहे. हा उपक्रम गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार आहे. राज्य शासनाकडून लवकरच ही योजना कार्यान्वित होत आहे.
पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा
जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी थांबून ११२ नंबर डायल केल्यास अवघ्या दहाव्या मिनिटांत घटनास्थळी मदतीसाठी पोलिसांची मोबाइल व्हॅन यंत्रणेसह येईल. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत होणार आहे. ही यंत्रणा २४ तास सतर्क राहणार आहे.
‘कॉल’ येताच कळणार ‘लोकेशन’
राज्यातील कोणत्याही भागातून ११२ नंबरवर येणाऱ्या कॉलचे केंद्रीकरण नवी मुंबई व नागपूर अशा दोन भागात केले आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी नवी मुंबई हे मुख्य नियंत्रण कक्ष आहे. कोल्हापुरातून ११२ ला डायल केल्यास तो कॉल प्रथम नवी मुंबईतील नियंत्रण कक्षात जाईल तेथून कोल्हापुरातील नियंत्रण कक्षात कॉलचे लोकेशन दाखवले जाईल. ज्या भागातून कॉल आला, त्या परिसरातील पोलिसांच्या बीटमार्शल मोबाइल व्हॅनला संदेश देऊन ते तत्काळ घटनास्थळी पोहोचेल व दहा मिनिटांतच पीडितेला मदत मिळेल.
१६ चारचाकी, ३५ दुचाकी
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात दि.१३ एप्रिल रोजी १६ चारचाकी व ३५ दुचाकी नव्याने वाहने दाखल झाली. ही वाहने फक्त ११२ डायल उपक्रमासाठीच वापरायची आहेत. या वाहनांना तत्काळ चालकही उपलब्ध करून दिलेले आहेत.
११६ कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
जिल्हा पोलीस दलातील ११६ पोलिसांना ‘११२ डायल’ या उपक्रमासाठी प्रशिक्षण दिले. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत कशी करावी. याबाबत जिल्ह्या-जिल्ह्यात पोलिसांना प्रत्येकी आठ दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले आहे.
कोट...
राज्य शासनाच्या गृह विभागाकडून ११२ डायल हा उपक्रम लवकरच कार्यान्वित होत आहे. यासाठी कोल्हापूर पोलीस दलात वाहने दाखल झाली. पीडिताने ११२ ला डायल केल्यास त्याला अवघ्या दहा मिनिटांतच घटनास्थळीच मदत मिळणार आहे. या उपक्रमामुळे गुन्हेगारीला आळा बसेल.
- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.
पॉइंटर...
- पोलीस स्टेशन : ३१
- पोलीस चौक्या : ३०
- पोलीस अधिकारी : २५५
- पोलीस कर्मचारी : २७५३
फोटो नं. २४०५२०२१-कोल-पोलीस०१,०२