गडहिंग्लज : भाजप दिव्यांग विकास आघाडीतर्फे गडहिंग्लजमध्ये दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता. आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. याप्रसंगी ‘दिव्यांगांचा समस्या व त्यांचे निराकरण’ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय योजना, दिव्यांग व्यक्तींची नोंदणी, पेन्शन, संजय गांधी योजनेचे अनुदान, घरफाळ्यातील ५० टक्के सवलत यांवर चर्चा झाली.
मेळाव्यास भाजपचे तालुका सरचिटणीस संदीप नाथबुवा, आघाडीचे उपाध्यक्ष संजय पोवार, सुगंधा लोहार, सुवर्णा बंदी, आदी उपस्थित होते.
............................................
मराठी विज्ञान परिषदेचा उद्या वर्धापनदिन
गडहिंग्लज : येथील मराठी विज्ञान परिषदेचा उद्या, गुरुवारी तिसरा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, परिषदेचे अध्यक्ष जे. बी. बार्देस्कर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता भडगाव रोडवरील सायन्स सेंटरच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
.........................................
तनवडीमध्ये कलमेश्वर मठात दीपोत्सव
गडहिंग्लज : तनवडी (ता. गडहिंग्लज) येथील कलमेश्वर मठात कार्तिक मासानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. नूलच्या सुरगीश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज यांच्या हस्ते कमलेश्वर स्वामींच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीपोत्सवास सुरुवात झाली.
याप्रसंगी गुरुसिद्धेश्वर स्वामीजी व भगवानगिरी महाराजांचे प्रवचन झाले. यावेळी पांडुरंग पाटील, अप्पासाहेब पाटील, अर्जुन सुतार, राजू पाटील, राजू तिगडी, बसवाणी पाटील, मल्लिकार्जुन आरबोळे, रामगोंडा पाटील, मारुती पाटील, भीमा माने, सिद्धाप्पा पाटील, पप्पू आरबोळे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. उदय देसाई यांनी प्रास्ताविक केले. बी. एस. पाटील यांनी आभार मानले.