कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेच्या ‘वर्ग-३’, ‘वर्ग-४’च्या १९४ जागांसाठी भरती प्रक्रियेला वेग आला आहे. सर्वच पदांसाठी उमेदवारांची संख्या मोठी आहे. सरळसेवा पद्धतीने परीक्षेतील गुणवत्ता (मेरिट)नुसार निवड होणार आहे. तरीही बहुतांश उमेदवार ‘वशिला’ कोठे लावता येतो का, याची चाचपणी करीत आहेत. यातूनच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांना भेटून परीक्षार्थी ‘साहेब, माझं तेवढं काम करा की!’ असं साकडं घालत आहेत. ‘काय द्यायचं झाल्यास देऊ; तेवढं काम करा,’ असे म्हणण्यापर्यंत काहीजणांची मजल गेली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती यांच्या कक्षांत गर्दी होत आहे. थेट घरी जाऊनही भेट घेऊन वशिला लावला जात आहे. जिल्हा परिषदेने २० आॅगस्टपासून रिक्त असलेल्या विविध विभागांतील रिक्त १९४ पदांची जम्बो नोकरभरती प्रक्रिया सुरू केली. यासाठी तब्बल १८ हजार ३९८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.जागा कमी आणि उमेदवारांची संख्या प्रचंड असे चित्र आहे. यामुळे प्रचंड रस्सीखेच आहे. शिपाई पदासाठीही उच्चशिक्षितांनी अर्ज केले आहेत. काम करण्याची खात्री असल्यास पैसे देण्याची तयारीही काहीजणांनी केली आहे. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या परीक्षा होत आहेत. परीक्षेतील गुणवत्तेनुसार भरती होणार आहे. त्यामुळे गुणवत्तेमध्ये नसताना कोणत्या पदासाठी भरती होऊ शकत नाही. जाहिरातीमध्ये या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. तरीही अभ्यास करण्याचे कष्ट न घेता, विनाकष्ट नोकरी धरण्यासाठी शॉर्टकट मार्ग मिळतो का, याचा शोध घेतला जात आहे. वशिला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे जिल्हा परिषदेत दलालांची वर्दळ वाढली आहे. ते पदाधिकारी, सदस्य यांची भेट घेऊन विनवण्या करीत आहेत. अपवाद वगळता बहुतांश सदस्य मन दुखवायचे नाही, योगायोगाने झालेच तर मीच केले असे सांगण्यासाठी निवडीसाठी गुणवत्ता (मेरिट) हवे, अभ्यास करा असे न सांगता करूया, बघू या, अधिकाऱ्यांना बोलतो, अशी आश्वासने देत आहेत. झाले तर माझ्यामुळे...‘झाले तर माझ्यामुळे; नाही झाले तर मेरिटमध्ये बसले नाही, मी काय करू?’ असा पवित्रा घेण्यासाठी काही पदाधिकारी, सदस्य उमेदवारांना बघूया, करूया, सांगतो, असे उत्तर देत आहेत. दरम्यान, उमेदवारांनी वशिल्याच्या पाठीमागे न लागता, अभ्यासाच्या पाठीमागे लागावे असे सांगण्याची तसदी घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. नोकरभरतीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. कोठे चुकीचे घडले, त्रुटी राहिल्यास काहींनी न्यायालयात जाण्याची तयारीही केली आहे. यामुळे प्रशासनाकडून नियमांवर बोट ठेवून भरती प्रक्रिया करण्याला प्राधान्य दिले जात आहे.
साहेब, माझं तेवढं काम करा की...
By admin | Published: November 06, 2014 12:12 AM