कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने स्थापन केलेल्या ‘वॉर रुम’मधील फोनची रिंग वाजते. तत्काळ फोन उचलला जातो. पलीकडील व्यक्ती अतिशय घाबरलेली असते. घाबऱ्या आवाजातच चौकशी केली जाते... हॅलो, वॉर रुम का?.. होय म्हणेपर्यंत पलीकडून कापरा आवाज ऐकू येतो... साहेब, आमचा रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. ऑक्सिजन लेव्हलही कमी झाली आहे. शहरातील कोणतंही रुग्णालय असू द्या, पण तातडीने बेड द्या हो. काही मिनिटांत उलट फोन करून रुग्णाच्या नातेवाईकांना माहिती दिली जाते आणि एका रुग्णाच्या उपचाराचा प्रश्न सुटलेला असतो.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात स्थापन केलेल्या ‘वॉर रुम’मध्ये अखंड चोवीस तास रुग्णांचे नातेवाईक आणि वॉररुममधील कर्मचारी यांच्यात संवाद सुरू असतो. वॉररुममध्ये उपचार जरी मिळत नसले तरी रुग्णावरील उपचाराकरिता योग्य मार्गदर्शन मिळते. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर तातडीने उपचार सुरू होण्यास नक्कीच मदत होते.
एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली की, कोणत्या रुग्णालयात दाखल करावे, बेड मिळणार का? असा प्रश्न नातेवाईकांना पडतो. पहिल्या लाटेवेळी रुग्णाला वाहनात घेऊन नातेवाईकांना अनेक रुग्णालये धुंडाळावी लागली होती. तातडीने बेड न मिळाल्यामुळे काहींना वाहनात, रुग्णालयाच्या दारात प्राण सोडावे लागले होते. त्यामुळे होणारी ही फरपट लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने योग्य वेळी वॉररुम सुरू केले.
ऑक्सिजन बेड लागणार का?
वॉररुममधून फोनवर रुग्णाचे नाव, पत्ता, वय, फोन नंबर, ऑक्सिजन लेव्हल, कधी पॉझिटिव्ह आला, एचआरसीटी स्काेर आदींबाबत विचारणा केली जाते. रुग्णाला ऑक्सिजन बेड लागणार आहे का? याची विचारणा केली जाते. रुग्णांच्या सद्य परिस्थितीनुसार त्याच्या घरापासून जवळचे रुग्णालय सुचविले जाते. तसेच रुग्णालयासदेखील रुग्ण येत असल्याची माहिती दिली जाते. रुग्णाची प्रकृती, लक्षणे, ओटू बेड, नॉन ओटू बेड, रुग्णालय याची माहिती संकलित करून योग्य मार्गदर्शन केले जाते. रुग्णांचा वेळ वाचतो. नातेवाईकांची धावपळ थांबते.
-वॉररुमचे कामकाज कसे चालते? -
‘वॉररुम’साठी महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी सात ते दुपारी तीन, दुपारी तीन ते रात्री दहा आणि रात्री दहा ते सकाळी सात अशा तीन पाळ्यात प्रत्येकी दोन शिक्षक काम करतात. तेथे चौदा शिक्षकांची नियुक्ती केली आहे. दिवसभरात तीनवेळा संगणकावर बेडबाबत माहिती संकलन करून ती अद्ययावत केली जाते. रेमडेसिविर इंजेक्शन कोठे मिळणार याची माहिती येथून दिली जाते.
कोट-
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना योग्य माहिती आणि तीही विनाविलंब मिळावी. रुग्णावर तातडीने उपचार होण्यास मदत व्हावी या हेतूने ही वॉररुम सुरू केली आहे. दिवसा कमी आणि रात्रीच्या वेळी जास्त फोन येतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यातील विशेषत: पुण्यातूनही फोन येऊ लागले आहे.
निखिल मोरे,
उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी