- वसंत भोसलेभारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचा आज (१५ सप्टेंबर) जन्मदिन! तो ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. १८६१ मध्ये जन्मलेल्या विश्वेश्वरय्या यांना तब्बल १०१ वर्षांचे आयुष्य लाभले. १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांचे बंगलोर मुक्कामी निधन झाले. या प्रदीर्घ आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणारा एक द्रष्टा अभियंता, महान अभियंता, उत्तम प्रशासक, उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजसेवक, भाषाप्रेमी, क्रीडापे्रमी आणि नियोजनकार अशी विविध रूपे त्यांची आहेत. त्यांचा आणि महाराष्ट्राचा खूप जवळचा संबंध आहे. त्यांचे अभियांत्रिकी शिक्षणच पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये झाले आणि त्यांनी पहिली सरकारी नोकरी महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागातच सलग चोवीस वर्षे केली. ते उत्तम मराठी बोलत होते. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्यापासून अनेक मान्यवरांशी त्यांचा परिचय होता. खानदेशातील धुळ्यापासून पुणे शहराला पाणीपुरवठा योजना आखण्यापर्यंत आणि कोल्हापूरचे राजे राजर्षी शाहू महाराज यांच्या निमंत्रणावरून राधानगरीच्या धरणाचे स्वयंचलित दरवाजे बसविण्यापर्यंतची कामे त्यांनी केली. एका अर्थाने महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाणीपुरवठ्याचा पायाच त्यांनी घातला, असे म्हणायला हरकत नाही.अशा या थोर अभियंत्याचे चरित्र धुळ्याचे मुकुंद धाराशिवकर यांनी मराठीतून लिहिले आहे आणि ते श्री. अरविंद पाटकर यांच्या ‘मनोविकास’ प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. गतवर्षी अभियंता दिनानंतर ते माझ्या हाती पडले. दरवर्षी १५ सप्टेंबरला या महान अभियंत्याचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा होतो आणि आपणास फारशी माहितीच नाही, याची खंत वाटायची. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले की, भोगावती तसेच पंचगंगा नद्यांची पाणीपातळी वाढणार, अशी अनामिक भीती वाटायची. त्याचवेळी हा स्वयं दरवाजाचा प्रयोग सर विश्वेश्वरय्या यांनी केला, याची आठवण यायची. एका महान अभियंत्याने जगात प्रथमच पुण्याजवळील खडकवासला धरणावर स्वयंचलित दरवाजांचा प्रयोग१९०१ मध्ये केला आणि दुसरा प्रयोग १९३७ मध्ये राधानगरी धरणावर यशस्वीपणे केला. त्या काळात विश्वेश्वरय्या यांच्या नावे या स्वयंचलित दरवाजाचे पेटंट मिळाले होते. सायफनने कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्याची पद्धतही त्यांनी आखून दिली. नदीच्या पात्रात जॅकवेल बांधून पाण्याचा उपसा करण्याचा शोधही त्यांनीच लावला. कालव्याद्वारे पाणी देण्याची योजना ही पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवरील धरणावर शंभर वर्षांपूर्वी त्यांनी आखली आणि यशस्वी करून दाखविली.महाराष्टÑाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम करताना त्यांनी त्याची सुरुवात धुळे जिल्ह्यापासून केली. साक्री, धुळे, आदी परिसरात शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी हाताळला होता. त्याकाळी पाटबंधारे विभाग स्वतंत्र नव्हता. १८८४ ते १९०८ अशी चोवीस वर्षे त्यांनी महाराष्ट्राची सेवा केली. अखेर त्यांनी सरकारी सेवेचा राजीनामा दिला आणि जगभर प्रवास करून आल्यावर म्हैसूरच्या संस्थानामध्ये रावबहाद्दूर म्हणून सोळा वर्षे काम केले. मुकुंद धाराशिवकर आणि अरविंद पाटकर यांचे विशेष आभार मानायला हवेत की, एका महान अभियंत्याचा सविस्तर परिचय पुस्तक रूपाने मराठी माणसाला करून दिला. मराठीतील विश्वेश्वरय्या यांच्यावरील हे पहिले पुस्तक असावे. याचीही खंत वाटते. त्यांचा आज, १५८ वा जन्मदिन आहे. म्हणजे त्यांच्या निधनानंतरही ५६ वर्षे या महान अभियंत्यावर कोणाला लिहावे, असे वाटले नाही. मराठी भाषा समृद्ध व्हावी, ती ज्ञान भाषा व्हावी, असे अनेकजण म्हणतात. मात्र, त्याचवेळी मराठी भाषेत अशा महान व्यक्ती, त्यांचे कार्य, चरित्र, त्यांनी मानवी कल्याणासाठी दिलेले योगदान येणार नसेल तर, मायमराठी समृद्ध कशी होणार? मुकुंद धाराशिवकर यांनी विश्वेश्वरय्या यांचे कार्य मराठी माणसाला समजून सांगण्यासाठी जे कष्ट उपसले, जी यातायात केली आहे, भटकंती केली आहे, कागदांची जुळवाजुळव केली आहे, त्याला तोड नाही. विश्वेश्वरय्या यांची पहिली नोकरी धुळ्यात सुरू झाली आणि त्याच धुळ्याचे सुपुत्र धाराशिवकर आहेत, हादेखील एक योगायोग आहे. ते देखील यशस्वी अभियंते आहेत. अरविंद पाटकर यांच्याविषयी काय लिहावे. हा कामगार चळवळीत काम करणारा माणूस प्रकाशन व्यवसायात येऊन ‘मनोविकास’ या संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रयोगच करतो आहे. मराठी भाषा संवर्धन आणि समृद्धीचा वारकरी झाला आहे.माझ्या सदरात या पुस्तकावर लिहावे, विश्वेश्वरय्या मला समजले तेवढे सर्वांना सांगावे म्हणून त्यांचा जन्मदिन येण्याची एक वर्ष वाट पाहत बसलो होतो. योगायोगाने आज, १५ सप्टेंबर आला आहे. आपले अभियंते तो ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा करतील. पण, आपण साऱ्यांनी विशेषत: महाराष्ट्राने या महान अभियंत्याचे ऋणी राहिले पाहिजे. गेल्याच महिन्यात आलेल्या महापुराच्या काळात राधानगरी, खडकवासला या धरणांचे स्वयंचलित दरवाजे अनेकवेळा उघडले. ही पद्धत केवळ अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी नाही, तर या धरणांमध्ये पाण्याचा अतिरिक्त साठा तयार व्हावा, याच्यासाठीसुद्धा आहे. १९३७ मध्ये बसविलेले दरवाजे आजही ‘दार उघड बया, दार उघड’ या पद्धतीने उघडतात आणि अतिरिक्त पाणी खळाखळा वाहून जाते.डॉ. सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचे योगदान केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातच नाही, तर ते एक उत्तम नियोजनकार होते. त्याला अर्थशास्त्राची जोड होती. त्यांना सामाजिक परिस्थितीचे भान होते. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रांची पार्श्वभूमी होती. म्हैसूरच्या संस्थानामध्ये दिवाणबहाद्दूर म्हणून सोळा वर्षे काम करताना त्यांनी असंख्य योजना राबविल्या. गरिबाला आणि पददलिताला मोफत शिक्षण दिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. सक्तीचे प्राथमिक शिक्षण असायला हवे म्हणूनही त्यांनी निर्णय घेतला. औद्योगिकरणाची वाट धरल्याशिवाय प्रगती होणार नाही म्हणून त्यांनी कारखानदारी उभारणीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, हे ओळखले. शिमोगाजवळ ‘भद्रावती आर्यन अॅन्ड स्टील’ ही कंपनी त्यांनी उभारली. त्यांनी या सर्वांची एक सूत्रबद्ध पद्धतीने आखणी करून मांडणी केली. सर विश्वेश्वरय्या हे जगातील पहिले नियोजनकार आहेत की, ज्यांनी पंचवार्षिक योजनांची संकल्पना मांडली. १९२० मध्ये ही संकल्पना मांडून नियोजनबद्ध विकास केला पाहिजे, असे ते म्हणत असत. ते एवढे करून थांबले नाहीत, तर एक भली मोठी यादी तयार केली. स्टील उद्योग, वस्त्रोद्योग, गृहबांधणी, ऊर्जानिर्मिती, शेती विकास, रोजगार निर्मिती, बॅँकिंग, आदी सर्व क्षेत्रांत भारताला कशी संधी आहे, याचा त्या यादीत समावेश केला. १९४३ मध्ये ही यादी त्यांनी जाहीर केली होती. मोठे उद्योग, संरक्षण क्षेत्रासाठी उद्योग, रासायनिक उद्योग, शिपिंग, बंदर विकास, आदींचाही त्यांनी सखोल विचार मांडला होता. एक प्रकारे भारताने स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजना स्वीकारण्यापूर्वीच या द्रष्ट्या अभियंत्याने त्याची आखणी केली होती. भारताने रशियाकडून पंचवार्षिक योजनांचे मॉडेल स्वीकारले, असे मानले जाते. मात्र, विश्वेश्वरय्यांनी १९२० मध्येच ही कल्पना मांडली होती.शेतीला पाणी देण्याची पद्धत विकसित करण्यापासून, ग्रामीण जनतेसाठी अल्पबचत योजना सुरू करणे, पीककर्जे देणे, उद्योगनीती, अर्थनीती सुधारण्याचा पाया घालणे, सर्वांना शिक्षण, कौशल्य विकास आणि उच्च शिक्षणाचा प्रसार याचे धोरण निश्चित करणे, अवजड यंत्रसामग्री, पोलाद, लोखंड, सिमेंट या वस्तू देशातच तयार व्हाव्यात, त्यातून रोजगार निर्मिती वाढेल, आर्थिक प्रगती साधली जाईल, असे धोरण त्यांनी आखले. राज्य कारभार सुधारण्यासाठी लोकसहभाग वाढला पाहिजे, असाही त्यांचा आग्रह होता. त्यासाठीच्या योजना गावपातळीपर्यंत राबविल्या. भारतीयांनी भारतीयांसाठी संस्थान क्षेत्रात त्यांनीच म्हैसूर विद्यापीठाच्या रूपाने पहिले विद्यापीठ स्थापन केले. उद्योगांना पतपुरवठ्यासाठी बॅँक आॅफ म्हैसूरची स्थापना केली. सरकारी सेवेत प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेची देशात पहिल्यांदा त्यांनी पद्धत सुरू केली. कर्म-कार्यक्षमता वाढीस लागावी म्हणून इफियन्सी आॅडिट पद्धत सुरू केली. तालुका तसेच जिल्हा पातळीवर विकास आराखडा म्हैसूर संस्थानमध्ये सुरू केला. सर विश्वेश्वरय्या यांची ओळख एक महान अभियंता एवढीच सर्वसामान्य माणसांसमोर आहे. पण, त्यांनी अर्थशास्त्र, उद्योग, शेती, प्रशासन, बेरोजगारी, शिक्षण, कौशल्य शिक्षण, बॅँकिंग, आदी सर्वांचा विचार केला होता, त्याला नियोजनाची जोड दिली होती.हा सर्व विचार मांडण्यासाठी २८ पुस्तके लिहिली. ते एक उत्तम लेखकही होते. त्यांची वेशभूषा युरोपियन वाटत असली तरी, डोक्यावरील पगडी मात्र भारतीय (कर्नाटकी) होती. त्यामुळे त्यांनी इंग्रजी, गणित, पदार्थ विज्ञान, आदी विषयांचा आग्रह धरला. तरी प्रादेशिक भाषा विकसित झाली पाहिजे, यासाठी खास प्रयत्न केले. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत झाले पाहिजे, असा विचार मांडणारा हा आधुनिक विचारवंत होता. राहणीमान, जीवनपद्धती यावरही त्यांनी विचार मांडले होते. म्हणून तर ते उत्तम प्रकारे शंभर वर्षांचे आयुष्य जगले. वयाच्या ९६व्या वर्षी
आधुनिक भारताचे स्वप्न पाहणारे सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:47 PM