राधानगरी : पाचगाव (ता. करवीर) येथील शामराव पांडुरंग फडतरे यांच्या खूनप्रकरणी राधानगरी पोलिसांनी रविवारी मृताची पत्नी सुमन शामराव फडतरे व मुख्य सूत्रधार रणजित पाटील याची आई आक्काताई मारुती पाटील या दोघींना अटक केली. त्या सख्ख्या बहिणी आहेत. तासगाव (जि. सांगली) पोलिसांनी शनिवारी हा गुन्हा उघडकीस आणून पाचजणांना अटक केली होती. खुनाचा गुन्हा राधानगरी पोलिसांकडे वर्ग झाला असून पोलिसांनी संशयीतांना रविवारी कोल्हापुरातील न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. गुडाळ (ता. राधानगरी) येथील रणजित मारुती पाटील याने अमोल संजय कुंभार, विनायक सुधीर गुरव (दोघे रा. तासगाव), स्वप्निल संजय तोरस्कर व नावीन्य दशरथ महाजन (रा. निपाणी) यांच्या मदतीने शामराव फडतरे यांचा १८ जुलैला गुडाळ येथील त्यांच्या घरातच गळा आवळून खून केला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह निपाणीजवळील नदीत टाकला होता. दरम्यान, तासगाव पोलिसांच्या ताब्यातून त्यांना घेऊन रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या खुनाची सुपारी त्याच्या पत्नीने दिल्याचे स्पष्ट झाल्याने तिला व खुनाच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून आक्काताई पाटील हिला रविवारी अटक करण्यात आली. या दोघींना आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव व राधानगरीचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत सुर्वे यांनी गुडाळ येथे ज्या घरात खून झाला, त्या ठिकाणाला भेट देऊन माहिती घेतली.
फडतरे खूनप्रकरणी सख्ख्या बहिणींना अटक
By admin | Published: August 01, 2016 12:48 AM