गडहिंग्लज : पाय घसरून विहीरीत बुडणाऱ्या भावाला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या बहिणाचाही पाण्यात बुडून मृत्यु झाला. प्रेरणा मनोहर कांबळे (वय १८) व राजवीर किशोर तराळ (वय ८) अशी दुदैवी मृत बहिण- भावांची नाव आहेत.हिडदुग्गी (ता.गडहिंग्लज) येथील हृदयद्रावक घटनेने हलकर्णी पंचक्रोशीसह गडहिंग्लज तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी (१०) सायंकाळी प्रेरणा ही आपल्या घराशेजारी असलेल्या खोडगे यांच्या विहीरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती.सोबतीसाठी म्हणून राजवीरदेखील तिच्याबरोबर विहीरीवर गेला होता. धुणे धुवून झाल्यावर राजवीर हा हातपाय धुण्यासाठी पाण्यात उतरला. त्यावेळी पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रेरणासुध्दा पाण्यात उतरली. परंतु, दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले.सायंकाळी बराच वेळ झाला तरी दोघेही घरी परत न आल्यामुळे नातेवाईक आणि शेजार्यांनी शोधाशोध केली.त्यावेळी दोघेही विहिरीत बुडाल्याचे निदर्शनास आले. तातडीने त्यांना पाण्यातून बाहेर काढून गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. परंतु,उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.प्रेरणा व राजवीर हे दोघे सख्खे चुलत बहिण-भाऊ होत.प्रेरणा ही गडहिंग्लज शहरातील जागृती प्रशालेत १२ वी कला शाखेत शिकत होती. तिच्या पश्चात आई -वडील व विवाहित बहीण असा परीवार आहे.राजवीर दुसरीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी-आजोबा व काका असा परिवार आहे. मनोहर कांबळे यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलीसात घटनेची नोंद झाली आहे . हवालदार पांडुरंग कुंभार अधिक तपास करत आहेत.शुभकार्यासाठी आले अन् ...!खाजगी कंपनीतील नोकरीमुळे राजवीरचे वडील सहकुटुंब गोव्यात वास्तव्याला आहेत. लहान भाऊ दीपकचे लग्न जमविण्यासाठी कांही दिवसापुर्वी ते गावी हिडदुगीला आले आहेत. भावाच्या शुभकार्यासाठी सहकुटुंब गावी आलेल्या किशोर यांच्या एकुलत्या मुलावर काळाने झडप घातली. वाढदिवसाच्या आनंदावर विरजण...!शनिवारी(१०)प्रेरणाची मोठी बहीण प्रज्ञा हिचा वाढदिवस होता. घरात वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच झालेल्या प्रेरणा आणि राजवीर यांच्या दुदैवी मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे.