शिरोळ : शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी पूरग्रस्त अन्याय निवारण समितीचे बुधवारी दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. मागण्याबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याची माहिती रामचंद्र डांगे यांनी दिली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढल्याप्रकरणी समितीच्या चौदाजणांविरुध्द शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी मंगळवारी शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. जवळपास तीसहून अधिक मागण्या समितीने शासनाकडे केल्या आहेत. पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी आंदोलनाचा हा लढा सुरू राहणार असल्याचे समितीने जाहीर केले होते. त्यानुसार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. कितीही गुन्हे दाखल करा पण आम्ही पूरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी मागे हटणार नाही, अशी भूमिका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही शिरोळ येथे काढण्यात आलेल्या मोर्चाप्रकरणी समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, डॉ. संजय पाटील, सुरेश सासणे, दशरथ काळे यांच्यासह प्रमुख चौदाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.