कोल्हापूर : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाने गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून जाणारा मुंबई, पुण्याला जाणारा दूधपुरवठा रोखण्याचे आंदोलन सुरु केले. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरक्षणासह विविध मागण्यांसाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने गुरुवारी मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांना संघात प्रवेश करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे या आंदोलनकर्त्यांनी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करीत राज्य सरकारचा निषेध केला. आरक्षण मिळेपर्यंत गनिमी काव्याने लढा तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.
गोकुळ दूध संघाच्या चौकातून ‘एक मराठा - लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, अशा घोषणा देत आंदोलनकर्ते सकाळी पावणेदहाच्या सुमारास संघाच्या प्रवेशद्वारात आले. संघामध्ये प्रवेश करून दुधाचे टँकर रोखण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी त्यांना आत जाण्यास परवानगी नाकारली आणि त्या ठिकाणीच रोखले. त्यावर आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या मारला आणि घोषणा देत राज्य सरकारचा निषेध केला.
राज्य सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे. मेगा भरती, पोलीस भरती त्वरित थांबवावी, आदी आमच्या मागण्या आहेत. त्यांच्या पूर्ततेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही पुन्हा लढा सुरू केला आहे. आज पोलिसांच्या बळाचा वापर करून आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो. यापुढे गनिमी काव्याने लढा तीव्र केला जाईल, अशा इशारा सकल मराठा समाजाच्या मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी यावेळी दिला.
सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, आदींनी मनोगते व्यक्त केली. साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात सचिन खांडेकर, प्रतिराज लाड, अजिंक्य पाटील, शुभम गिरी, उदय प्रभावळे, राजेंद्र चव्हाण, नितीन देसाई, उत्तम पोवार, सुनील चव्हाण, अभिषेक जाधव, रवींद्र मुदगी, लखन पाटील, आदी सहभागी झाले. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दूध संघाच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता.