कुरुंदवाड : मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मनमानी कारभाराविरोधात प्रशासनाच्या निषेधार्थ शहर बचाओ कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शहरातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी आंदोलकांनी पालिका कर्मचारी आनंदा शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन शहरातील अंतर्गत रस्त्याबाबत चार दिवसात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
पालिकेसमोर झालेल्या ठिय्या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व राजू आवळे, सुनील कुरुंदवाडे यांनी केले.
शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करावीत, या मागणीसाठी शहर बचाओ कृती समितीच्यावतीने सोमवारी शहरातील जुना बसस्थानक रस्त्यावरील खड्ड्यात वळकटी आंदोलन केले होते. तीन तास आंदोलन करूनही निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्याधिकारी जाधव आले नसल्याने शिवाय पोलीस बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याने कृती समितीच्यावतीने मुख्याधिकारी जाधव यांच्या निषेधार्थ शहर बंदची घोषणा केली होती. शहरातील सर्वच व्यापारी, व्यावसायिकांनी बंदला प्रतिसाद दिल्याने शहरात शुकशुकाट पसरला होता.
मंगळवारी सकाळी समितीच्यावतीने मुख्याधिकारी जाधव यांच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करत सन्मित्र चौकातून निषेध फेरी काढण्यात आली. या फेरीत शहरातील विविध पक्षाचे कार्यकर्ते, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
निषेध फेरी पालिकेसमोर येताच पालिका चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी समिती अध्यक्ष अर्शद बागवान, राजू आवळे, सुनील कुरुंदवाडे, स्वाभिमानी संघटनेचे आण्णासो चौगुले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अभय पाटुकले, शैलेश व्होरा, विलास उगळे, शब्बीर बागवान, बाळासो कांबळे, राष्ट्रवादीचे बबलू पवार, रियाज शेख आदींची भाषणे झाली.
आंदोलनात बंडू उमडाळे, जय कडाळे, योगेश जिवाजे, अविनाश गुदले, सुनील जुगळे, इकबाल बागवान, महावीर आवळे, राजू बेले, आयुब पट्टेकरी, अमित आवळे, राजू देवकाते यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
फोटो - २४०८२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे शहर बचाओ कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदमुळे शहरात शुकशुकाट पसरला होता. तर दुसऱ्या छायाचित्रात पालिकेसमोर कृती समितीकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.