कोल्हापूर : शाळकरी मुलगा दर्शन शहा खून प्रकरणाची सुनावणी आज, सोमवारपासून तीन दिवस जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होत आहे. त्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे रविवारी सकाळी कोल्हापुरात आले. त्यांनी दहा वाजण्याच्या सुमारास देवकर पाणंद परिसरातील दर्शन शहाच्या घरी भेट दिली. यावेळी निकम यांना पाहून दर्शनच्या आईचे डोळे भरून आले. परिसरात पोलिसांचा फौजफाटा पाहून दर्शनच्या खून प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाला. एकुलत्या एका मुलापासून पोरक्या झालेल्या आईची केविलवाणी अवस्था पाहून उपस्थित पोलीस व नागरिकांचेही डोळे भरून आले. पंचवीस तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या खंडणीसाठी दि. २६ डिसेंबर २०१२ रोजी देवकर पाणंद येथील दर्शन रोहित शहा या शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित आरोपी योगेश ऊर्फ चारू चांदणे याला अटक केली होती. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. शासनाने या खटल्याच्या सुनावणीसाठी निकम यांची नियुक्ती केली. त्याच्या सुनावणीसाठी ते यापूर्वी २० जानेवारी रोजी कोल्हापुरात आले होते. आता या खटल्याची तीन दिवस टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. दरम्यान, अॅड. निकम यांनी रविवारी सकाळी देवकर पाणंद परिसराची पाहणी केली. आरोपींच्या घराची पाहणी केली. तेथूनच काही अंतरावर असलेल्या शेतवडीचीदेखील त्यांनी पाहणी केली. आजूबाजूला किती घरे आहेत, परिसर कसा आहे, आरोपीच्या घरापासून विहीर किती अंतरावर आहे, आरोपीने दर्शनचे अपहरण कोठून केले, उसामध्ये कोणत्या ठिकाणी त्याचा गळा दाबून मारले, तेथून विहिरीत कसे टाकले, या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती त्यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांच्याकडून घेतली.
उज्ज्वल निकम यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी
By admin | Published: February 09, 2015 12:54 AM