इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या खड्ड्यामध्ये युवा महाराष्ट्र सेनेने खड्ड्यात बसून आंदोलन करत वृक्षारोपण केले. तसेच नगरपालिकाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, दिवसभरात खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन अभियंता संजय बागडे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. खड्डे बुजविले नाहीत, तर पुन्हा असेच आंदोलन करण्याचा इशारा दिला.
नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर खड्ड्यांसंदर्भात गेल्या दोन महिन्यांपूर्वी संघटनेने आंदोलन केले होते. त्यावेळी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील यांनी चार दिवसांत खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते. याला दोन महिने उलटले तरी कोणतेच काम झाले नाही. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी रस्त्यातील खड्ड्यात बसून वृक्षारोपण केले. आंदोलनात सॅम आठवले, कृष्णा जावीर, सचिन बेलेकर, तानाजी सोनवले, अभिजित घोडगिरे, विशाल मोकाटे सहभागी झाले होते.
फोटो ओळी
१८०३२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या खड्ड्यामध्ये युवा महाराष्ट्र सेनेने खड्ड्यात बसून आंदोलन करत वृक्षारोपण केले.