संदीप बावचे-- जयसिंगपूरकचरा विल्हेवाटीचा मोठा प्रश्न जयसिंगपूर पालिकेसमोर आहे. सध्या चिपरी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे कचऱ्याचा प्रश्नदेखील पालिकेसमोर ‘आ’ वासून उभा राहिला आहे. कचरा टाकणे आणि त्याची विल्हेवाट यासाठी पालिकेने पर्याय शोधून नवीन जागेबरोबर घनकचरा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेतला आहे. येणाऱ्या काळात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याअगोदर त्याचे नियोजन पालिका करीत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींबरोबर शासनाच्या सहकार्याची गरज भासणार आहे. चिपरी हद्दीत मिळालेल्या दोन एकर जागेवर गेल्या तीन वर्षांपासून जयसिंगपूर नगरपालिकेकडून शहरातील घणकचरा, मृत जनावरे टाकण्यात येत होती. खाणीतील दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना जाणवू लागल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी १ जानेवारी २०१७ पासून चिपरी हद्दीतील खाणीत कचरा टाकण्यास विरोध केला होता. जयसिंगपूरच्या कचऱ्याला विरोध म्हणून कचरा डेपोसमोर चरखुदाई करून रस्ता बंद केला. दरम्यान, कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे सध्या पर्यायी जागाच उपलब्ध नसल्यामुळे पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींसमोर आव्हान उभे राहिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून खामकर मळ्यातील जुन्या विहिरीत कचरा टाकला जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भविष्यातील अडचणी ओळखून कचरा डेपोच्या भूसंपादनासाठी पाच कोटी रुपयाची तरतूद झाली आहे. त्याचबरोबर घनकचरा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून चार कोटी रुपयांची तरतूद देखील अर्थसंकल्पात केली आहे. एकूणच शहराला भेडसावणाऱ्या अडचणीला रोखण्यासाठी पालिकेने कचऱ्याचे नियोजन आखले आहे. पाठपुरावा गरजेचाघनकचरा प्रकल्प राबवायचा झाल्यास त्यासाठी सपाटीकरण असलेली जागा महत्त्वाची बाब आहे. या प्रकल्पांतर्गत वीजनिर्मिती, खतनिर्मिती त्याचबरोबर प्लास्टिकपासून फर्नेस आॅईल यासह अनेक प्रक्रियांचे पर्याय आहेत. हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रथम आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यानंतर त्याचा प्रस्ताव शासनाला सादर करावा लागणार आहे. पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे. तरच हा प्रकल्प येणाऱ्या काळात यशस्वी होऊ शकतो. शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार पाहता कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागेबरोबरच घनकचरा प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. पालिकेच्या अर्थसंल्पात सुमारे नऊ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचे नियोजन लवकरच केले जाणार आहे. - हेमंत निकम, मुख्याधिकारी, जयसिंगपूरन्यायालयीन वादजयसिंगपूर शहरातील कचरा सांगली-कोल्हापूर महामार्गावरील धर्मनगरजवळ सुरुवातीला टाकला जात होता. त्यानंतर नांदणी नाक्याजवळील खाणीत कचरा टाकण्यावरून नागरिकांचा विरोध झाला. शहरात बंद अवस्थेत असणाऱ्या विहिरीत कचरा टाकून त्या बुजविण्यात आल्या. त्यानंतर कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने चिपरी गावच्या हद्दीतही कचरा टाकण्यास विरोध झाल्याने सध्या न्यायालयीन वाद सुरू आहे. एकूणच शहरातील कचरा टाकण्याचा प्रश्न सध्यातरी गंभीर आहे.
बैठे पथक म्हणजे, ‘एकमेका साह्य करु...’
By admin | Published: February 28, 2017 12:25 AM