कोल्हापूर : गेल्या चोवीस तासांत कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ३६७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, तर सहाजणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. नव्या रुग्णसंख्येत कोल्हापूर शहरातील १७७ जणांचा, तर मृतांत कोल्हापूर शहर व इचलकरंजी शहरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या ही प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ५४,३९५ वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या १८१२ वर पोहोचली आहे.
दिवसभरातील कोरोनाग्रस्त मृतांत कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठेतील ६५ वर्षीय पुरुषाचा, इचलकरंजी शहरातील ७९ वर्षीय महिलेचा तसेच नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील ६५ वर्षीय पुरुष, नावली (ता. पन्हाळा) येथील ७० वर्षीय महिला, मालगाव (ता. मिरज, जि. सांगली) येथील ७९ वर्षीय पुरुष, राजापूर (जि. रत्नागिरी) येथील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
गेल्या चोवीस तासांत वाढलेल्या रुग्णसंख्येत कोल्हापूर शहरात सुमारे १७७ इतकी धक्कादायक रुग्णसंख्या ही शहरवासीयांना विचार करायला लावणारी आहे. दिवसभरात करवीर तालुक्यात २३, हातकणंगले तालुक्यात २९, पन्हाळा १३, चंदगड १० तसेच भुदरगड, कागल व शाहुवाडी तालुक्यांत प्रत्येकी ९, राधानगरी ८, शिरोळ ५, गडहिंग्लज १ अशी नवी कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे.
कोविड सेंटरमध्ये २२१० रुग्ण उपचार घेताहेत
एकीकडे वाढती रुग्णसंख्या पाहता दुसरीकडे गेल्या चोवीस तासांत ११६ कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, तर सद्या सीपीआरसह विविध कोविड सेंटरवर एकूण २२१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मास्क वापरा, अन्यथा कोरोना स्वीकारा...
गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात झपाट्याने वाढणारी कोरोनाची रुग्ण व मृत्यू संख्या ही सर्वसामान्य नागरिकांची धडकी भरवणारी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना घातलेले कोरोनाचे निर्बंध पाळण्याशिवाय तसेच मास्क वापरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.