लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथील दोन सराफी दूकाने फोडून सोन्या-चांदीचा ऐवज लंपास करणाऱ्या सहाजणांच्या घरफोडी टाळीला स्थानिक गुन्हे अन्वेशन व कळे पोलीसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांनी येथील अमृत व भोजलिंग ज्वेलर्स या सराफी दूकानात चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांचे ताब्यातून दोन दूचाकी व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे १ लाख ६० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टोळीचा म्होरक्या विशाल बाळासो टोणपे (वय २७, रा. शिवाजीनगर हुपरी, ता. हातकणंगले), सुभाष आप्पासो गोसावी (२७), त्याचा चुलतभाऊ विकास प्रकाश गोसावी (२३, दोघे रा. बागणी, ता. वाळवा, जि. सांगली), निखील दत्तात्रय वडींगेकर (२३, रा. माळापुडे, ता. शाहूवाडी), संदीप जयसिंग पाटील (३१), दिंगबर मारुती लोहार (३२, दोघे रा. सातार्डे, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
बाजारभोगाव येथील अमृत व भोजलिंग ज्वेलर्स या सराफी दूकानांच्या शर्टरची कुलुपे तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता. दोन्ही दूकानातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी २७ जून २०१७ कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई हे तपास करीत असताना खबऱ्याकडून त्यांना ही घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार सुभाष गोसावी व त्याचा चुलत भाऊ विकास गोसावी यांनी केल्याचे समजले. त्यानुसार या दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी विशाल टोणपे याने आम्हाला एकत्र करुन चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार सर्व संशयितांना अटक केली. संदीप पाटील याच्या घरात लपवलेले दागिने हस्तगत केले. गुन्ह्यात वापरलेल्या दोन दूचाकी पोलीसांनी जप्त केल्या.
सुभाष व विकास गोसावी यांनी शिराळा, पेठवडगाव, पन्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्या आहेत. या घरफोडी टोळीचा म्होरक्या विशाल टोणपे हा आहे. निखील वडींगेकर, संदीप पाटील, दिंगबर लोहार हे सेट्रींगची कामे करतात. टोणपे याने झटपट पैसा मिळविण्याचे आमिष दाखवून टोळीत दाखल करुन घेतले. त्यांचेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे उपअधिक्षक पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, उपनिरीक्षक राजेंद्र सानप, हावलदार राजेश आडुळकर, पोलीस नाईक संजय कुंभार, असीफ कलायगार, इरफान गडकरी, संदीप पाटील, वैभव खोत, रघुनाथ खोत उपस्थित होते.