कोल्हापूर : निवडणूक आयोगाच्या निर्देेशानुसार जिल्हा निवडणूक विभागाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत घेण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ लाख २४ हजार ४३७ मतदार वाढले आहेत, तर ४ हजार २४३ मतदार हे विविध कारणांमुळे रद्द होणार आहेत.
महिना अखेरपर्यंत प्राप्त अर्जांची शहानिशा व दावे हरकती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात कोल्हापूर दक्षिण मतदार संघात सर्वाधिक १६ हजार ७६२ अर्ज नव्याने मतदार नोंदणीसाठी आले असून याच मतदार संघात नव्याने सर्वाधिक मतदार नोंदणी होण्याची चिन्हे आहेत. या मतदार संघातील संभाव्य चुरस पाहता नवीन मतदारांचा हा आकडा महत्वाचा आहे. याच मतदार संघातील १२ हजार मतदार तीन महिन्यांपूर्वी झालेल्या तपासणीत रद्द झाले होते.निवडणूक विभागातर्फे गेले दोन महिने युद्ध पातळीवर मोहीम राबवून मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, स्थलांतर या संदर्भात जनजागृती केली होती. प्रत्येक केंद्रावर रविवारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) थांबून ही प्रक्रिया राबवीत होते. ३१ आॅक्टोबरअखेर मतदार नोंदणीचे जिल्ह्यातून १ लाख २४ हजार ४३७ अर्ज निवडणूक विभागाकडे आले आहेत.
या अर्जांची शहानिशा करण्यासाठी महिनाभर दावे व हरकतींसाठी मुदत राहणार आहे. यामध्ये आवश्यक ती कागदपत्रे नसल्यास संंबंधित मतदाराला कळविले जाणार आहे. ही तपासणी प्रक्रिया ज्या-त्या प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे. ही कागदपत्रे न जमा केल्यास संबंधितांना कळवून त्यांचे नाव रद्द करण्याची प्रक्रिया होणार आहे; परंतु बहुतांश जणांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने तुरळक नावे कमी होऊ शकतात. त्याचबरोबर या मोहिमेत नमुना क्रं.७ चे म्हणजे नावे वगळण्याचे ४ हजार २४३ अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यामुळे ही नावे रद्द होणार आहेत.
मयत, दुबार, स्थलांतर नावांचा समावेश आहे. तसेच नावातील दुरुस्तीचे २० हजार अर्ज, स्थलांतराचे १७२५ अर्ज निवडणूक विभागाकडे आले आहेत. याची तपासणी महिनाअखेरपर्यंत सुरू राहणार आहे. डिसेंबरमध्ये मतदार यादी छपाईचे काम सुरू होणार असून, ४ जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
नवमतदारांच्या अर्जांची संख्याविधानसभा मतदारसंघ अर्जांची संख्या
- चंदगड ११२४३
- राधानगरी ९९७५
- कागल १०६५५
- कोल्हापूर दक्षिण १६७६२
- करवीर ९८९०
- कोल्हापूर उत्तर १२१५३
- शाहूवाडी १०५५७
- हातकणंगले १२८७०
- इचलकरंजी १५७०६
- शिरोळ १३७१५
‘व्हीव्हीपॅट’चे १५ नोव्हेंबरपासून मतदान केंद्रांवर सादरीकरणनिवडणूक विभागातर्फे १५ नोव्हेंबरपासून प्रत्येक मतदान केंद्रावर ‘व्हीव्हीपॅट’ मशीनचे सादरीकरण केले जाणार आहे. १५ जानेवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. दरम्यान १९ व २० नोव्हेंबरला केर्ली येथील शासकीय गोदाम येथे ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ मशीनची चाचणीही घेण्यात येणार आहे.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातून १ लाख २४ हजार ४३७ नवमतदारांचे अर्ज आले आहेत. त्याचबरोबर नाव दुरुस्ती, नाव वगळणे, स्थलांतर असेही अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांच्या तपासणीचे काम महिनाभर सुरू राहणार आहे.- स्नेहल भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी