कोल्हापूर : भारत-सिंगापूर सहलीचे आमिष दाखवून भामट्यांनी आॅनलाईनद्वारे पाचगाव येथील तरुणास सव्वा लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी करवीर पोलीसांनी संशयित गौतम, राजेश, आशिष, रविश शर्मा, पियुश जैन, राजीव (पूर्ण नाव, पत्ता नाही) यांचेवर शुक्रवारी (दि. २) गुन्हा दाखल केला.अधिक माहिती अशी, राहुल रविंद्र जोशी (वय ३६, रा. मगदूम कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) यांच्या मोबाईलवर संशयित भामट्यांनी संपर्क साधला. आम्ही आय. टी. हॉलीडेज कंपनीशी संबधीत असून भारत-सिंगापूर सहलीचे आमिष दाखवून जोशी यांचेकडून १२ हजार ४९९ रुपये तसेच भेट वस्तुसाठी १० हजार २३२ रुपये भरुन घेतले. त्यानंतर बँक खात्याची माहिती घेवून परस्पर आॅनलाईनद्वारे त्यांच्या खात्यावरील ५० हजार आणि ३६ हजार ४०० रुपये काढून घेतले.
जोशी यांना आपली फसवणूक झालेचे समजताच त्यांनी या भामट्यांच्या विरोधात करवीर पोलीसांत फिर्याद दिली. या गुन्ह्याच्या तपासाबाबत सायबर विभागातील तज्ज्ञांची मदत पोलीस घेत आहेत.