चंदगड : कागणी (ता. चंदगड) येथे भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले हवालदार व सध्या चंदगड येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले आनंद देसाई यांनी पुढाकार घेत गावातील तरुणांना एकत्र करून लोकवर्गणीतून सहा लाखांची व्यायामशाळा उभारली आहे. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशिलकर व कोल्हापूरचे निवृत्त पोलीस निरीक्षक कृष्णा देसाई यांच्या हस्ते या व्यायामशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी उद्योजक दिनेश देसाई, अनिल भोगण, ज्योतिबा बाचूळकर, प्रा. अशोक बाचूळकर, महादेव जांभळे, महादेव मुरकुटे, जया खानापुरे, अण्णा बाचूळकर, विष्णू बाचुळकर, केदारी भोसले उपस्थित होते.
व्यायामशाळा बांधकामासाठी कागणी व नेसरी परिसरातील गवड्यांनी श्रमदान केले. इलेक्ट्रिकचे काम मोहन पाटील (कल्याणपूर), पत्रे बसविण्यासाठी ज्योतिबा देसाई यांनी तर रंगकामासाठी शिवाजी कांबळे यांनी मदत केली. आमची मुंबई मंडळाने ५५ हजारांची तर आजी-माजी सैनिकांनी १ लाखांची देणगी दिली. ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून ६० हजार रुपयांचा निधी दिला.
यासाठी आनंद देसाई, विनोद कुदनूरकर, संदीप तारिहाळकर, कपिल देसाई, कृष्णा सुळेभावीकर, शंकर पुजारी, गोवर्धन पुजारी, रणजित देसाई, सूर्याजी भोगण, जयराम कांबळे, सर्जेराव बाचूळकर यांनी परिश्रम घेतले.
--------------------
तालमीमध्ये व्यायाम करण्याची परंपरा आता पूर्णपणे नाहीशी होत आहे. सध्या तरूणांना अत्याधुनिक मशीनद्वारे व्यायाम करण्याचे वेड आहे. यासाठी गावातील नोकरदार व उद्योजकांनी सढळ हाताने मदत केली. यातून आम्ही ६ लाखांची सुसज्ज व्यायामशाळा उभी केली असून, सर्वांना मोफत सुविधा दिली जाणार आहे.
- विनोद कुदनूरकर, उपाध्यक्ष, जय हनुमान व्यायामशाळा, कागणी. ------------------------
* फोटो ओळी : कागणी (ता. चंदगड) येथे व्यायामशाळेचे उद्घाटन आनंद देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी विष्णू जोशिलकर, शंकर पुजारी, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १६०४२०२१-गड-०८