लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चंदगड आणि बिद्री येथे झालेल्या अनधिकृत कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू व पंचांवर सहा महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेच्या रविवारी झालेल्या सभेत घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे सहकार्यवाह प्रा. संभाजी पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात कबड्डी स्पर्धा आयोजनासाठी राज्य संघटनेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि बिद्री येथे झालेल्या कबड्डी स्पर्धांना स्पर्धांना जिल्हा संघटनेची मान्यता नव्हती. त्यामुळे या स्पर्धा अनधिकृत ठरल्या असून, यामध्ये सहभागी झालेले खेळाडू व पंचांवर सहा महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय रविवारी झालेल्या सभेत घेण्यात आला. या स्पर्धेसाठी पंचानीही पंचप्रमुख अजित पाटील यांची परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धांच्या परवानगीबाबत रविवार, दिनांक ३ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्य कबड्डी असोसिएशनच्या सभेत चर्चा व्हावी, अशी विनंती जिल्हा संघटनेने केल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष डाॅ. रमेश भेंडीगिरी, उपाध्यक्ष भगवान पवार, अजित पाटील, सहकार्यवाह उदय चव्हाण, प्रा. चंद्रशेखर शहा, खजिनदार प्रा. आण्णासाहेब गावडे, मानसिंग पाटील, उद्य पाटील, शहाजहान शेख उपस्थित होते.