मुरगूड : वडिलांचे हार्डवेअरचे दुकान. पै- पै गोळा करून मुलगा कुलदीपला पोलीस खात्यामध्ये सेवेत घालण्याचे स्वप्न पूर्ण झाले. सहायक पोलीस निरीक्षक पदावर असलेला आपला मुलगा खाकी वर्दीत आपल्या जिल्ह्यात यावा, यासाठी आस धरलेल्या अशोक कदमांचा मात्र भ्रमनिरास झाला. छोट्याशा दुर्घटनेचे निमित्त झाले आणि सांगलीच्या क्राइम ब्रँचमध्ये सेवेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप अशोक कदम (वय ३४, रा. मुरगूड) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुरगूडमधील प्राथमिक शाळेतील शिक्षणानंतर येथील मुरगूड विद्यालय, ज्युनि. कॉलेजमध्ये त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. मंडलिक कॉलेजमध्ये बी.ए. पूर्ण करून म्हैसूर येथे त्यांनी बी.एड. पूर्ण केले होते. बारावीपासून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. यातूनच सन २०१२ मध्ये मुंबईतील बोरिवली येथे त्यांची सहा. पोलीस उपनिरीक्षकपदावर थेट नियुक्ती झाली. त्यानंतर गडचिरोली येथे सहायक पोलीस निरीक्षक पदावर बढतीने नियुक्ती करण्यात आली. ऑक्टोबर २०२० मध्ये सांगली पोलीस दलात ते हजर झाले होते. तिथेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात ते कार्यरत होते.
पंधरा दिवसांपूर्वी सांगली येथे त्यांचा किरकोळ अपघात झाला होता. त्यांच्या मोटारसायकलची सायकलस्वाराला धडक बसली होती. यामध्ये त्यांच्या मांडीला दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना मुरगूड येथे आणून पुढील उपचार सुरू केले. त्यांच्या मांडीची जखम बरी होत नसल्याने त्यांनी कोल्हापूरच्या खाजगी रुग्णालयात तपासणी केली. त्यामध्ये त्यांना कावीळ झाल्याचे स्पष्ट झाले. परिस्थिती बिघडत गेल्याने त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबई येथे नेण्याचे ठरवले; पण नियतीने रस्त्यातच डाव साधला आणि वाठार येथे प्रवासादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शांत, जिद्दी स्वभावाच्या एका तरुण अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू मनाला चटका लावून जाणार ठरला. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, पत्नी, चार आणि दोन वर्षांची मुले, असा परिवार आहे.
बारावी नापास; पण तरीही यशस्वी
मुरगूड विद्यालय ज्युनि. कॉलेजमध्ये बारावीमध्ये शिक्षण घेताना कुलदीप इंग्रजी विषयात नापास झाले होते. त्यानंतर पुरवणी परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. जिद्दीने इंग्रजीमध्येच बी.ए. केले. म्हैसूर येथे बी.एड.साठी गेले. तेथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बी.एड.नंतर कोल्हापूर येथे त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. घरी आर्थिक ताण नको म्हणून पाचवीमध्ये घेतलेली सायकल पोलीस उपनिरीक्षक होईपर्यंत ते वापरत होते, अशी आठवण सांगून त्यांचे वडील रडत होते.