मिरज : सलगरेजवळ रेल्वेमार्गालगत लावलेला लोखंडी फलक तुटून नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला घासल्याने रेल्वेत खिडकीकडेला बसलेले सहा प्रवासी जखमी झाले. बुधवारी दुपारी बारा वाजता पंढरपूर-मिरज रेल्वेमार्गावर कवठेमहांकाळ ते सलगरे स्थानकादरम्यान हा विचित्र अपघात घडला. जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंढरपूर ते मिरज रेल्वेमार्गावर कवठेमहांकाळ स्थानक सोडल्यानंतर सलगरे स्थानक येण्यापूर्वी रेल्वेमार्गालगत लावलेला लोखंडी फलक तुटून धावत्या रेल्वेला घासला. भरधाव निघालेल्या नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला तो घासत गेला. यामुळे काही क्षणातच एस-२, एस-४, एस-९ यासह जनरल बोगीतील खिडकीकडेला हात बाहेर काढून किंवा खिडकीत ठेवून बसलेले, दारात उभे राहिलेले सहा प्रवासी जखमी झाले.
यामुळे एक्स्प्रेसमध्ये गोंधळ उडाला. हात आणि चेहऱ्याला पत्रा कापल्याने रक्तबंबाळ झालेल्या प्रवाशांना सलगरे स्थानकावर कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. यामुळे एक्स्प्रेस मिरजेला येईपर्यंत रक्तबंबाळ झालेल्या प्रवाशांमुळे एक्स्प्रेसच्या डब्यांतील आसने रक्ताने भिजली होती. जखमी प्रवासी व नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. मिरज स्थानकात रेल्वे पोलीस, सुरक्षा दल व स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांनी जखमींना रिक्षांतून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अपघातात नासिरअली हसनअली सय्यद (वय ४३, रा. शिंदे मळा, सांगली), राजेश हरिश्चंद्र वरघडे (४४, रा. सौभाग्यनगर, नागपूर), सिरील डॅनियल तिरोरे (६२, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), बळवंत नानू शिंदे (३०, रा. धामोड, ता. राधानगरी) या हातावर व चेहºयावर जखमा झालेल्या चार प्रवाशांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. अन्य दोन जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली. या दुर्घटनेमुळे नागपूर एक्स्प्रेस एक तास विलंबाने कोल्हापूरकडे रवाना झाली. याबाबत मिरज रेल्वे पोलिसात नोंद आहे. रेल्वे अधिकºयांच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचे निष्पन्न झाल्यास याप्रकरणी सबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.घातपाताचा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावाअपघातात सय्यद, तिरोरे व शिंदे या प्रवाशांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर विभागाच्या रेलपथ विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताच्या ठिकाणी रेल्वेमार्गालगत कोणताही फलक किंवा खांब तुटलेला नसून, कोणीतरी बाहेरून काहीतरी फेकल्यामुळे प्रवासी जखमी झाले असावेत, असा रेल्वे अधिकाºयांनी दावा केल्यामुळे अपघाताबाबत गूढ निर्माण झाले आहे.