इचलकरंजी : येथील राकेश धर्मा कांबळे (वय ३२, रा गणेशनगर) याच्या खूनप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सोमवारी सहाजणांना ताब्यात घेतले, तर अन्य सात ते आठजणांवर गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून रविवारी (दि.१२) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पंचगंगा साखर कारखाना परिसरातील पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली.याप्रकरणी सूरज आनंदा कौंदाडे (वय २७, रा. दत्तनगर शहापूर), ओंकार दत्तात्रय खोत (२६), संदेश उर्फ स्वप्निल बाजीराव जाधव (२३, दोघे रा. भारतमाता हौसिंग सोसायटी), ऋषिकेश श्रीकांत साळुंखे (२५, रा. अग्निशामक दलासमोर), प्रतीक दीपक खोत (३५, रा. शाहूनगर हातकणंगले), राकेश रामा कोरवी (२६, रा. मुळीक गल्ली जवाहरनगर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह अन्य ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, पंचगंगा साखर कारखाना परिसरात असलेल्या एका चायनीज गाडीवर राकेश याचे संबंधित रोहन भोसले, वैभव मिरजे, प्रशांत आणि अमन, आदीजण खाद्यपदार्थ खात बसले होते. त्यांच्यामध्ये शिवीगाळसह चेष्टामस्करी सुरू होती. त्याचवेळी तेथून संशयित सूरज व त्याचा मित्र निघाले होते. सुरू असलेली शिवीगाळ आपल्याला पाहून केल्याच्या समजातून संशयितांनी संबंधितांना जाब विचारला. त्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.हा वाद सुरू असताना दोन्हीकडील अन्य काहीजण घटनास्थळी दाखल होऊ लागले. त्यातच राकेश याचाही समावेश होता. हाणामारी सुरू झाल्यानंतर काहीजणांनी तेथून पलायन केले, तर राकेश हा हल्लेखोरांच्या ताब्यात सापडल्याने त्यांनी राकेशाला मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी राकेश तेथून पळाला. मात्र, त्याचा पाठलाग करून टोळक्याने त्यास मारहाण करत पाठीत व पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याने राकेशचा मृत्यू झाला.राकेश हा अत्याधुनिक यंत्रमागावर काम करीत होता, तर संशयितापैकी प्रतीक दीपक खोत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.
Kolhapur: राकेश कांबळे खूनप्रकरणी सहाजण ताब्यात, आठजणांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:55 PM