प्रवीण देसाईकोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात २१ पोट मतदान केंद्रांची (सहाय्यकारी) भर पडणार आहे. सर्वाधिक प्रत्येकी आठ केंद्रे ही शिरोळ व इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नुकताच जिल्हा निवडणूक विभागाने भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर एकूण केंद्रांची संख्या ३३४२ होणार आहे.महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू आहे. टप्प्याटप्प्याने काम सुरू असून भारत निवडणूक आयोगाकडून याचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यात एकूण ३३२१ मतदान केंद्रे आहेत. एका मतदान केंद्रावर १५०० पर्यंत मतदार अपेक्षित आहेत. परंतु अनेक मतदान केंद्रांवर १५०० हून अधिक मतदार वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने १५०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या २१ केंद्रांवर पोट केंद्रे (सहाय्यकारी) करण्याचा निर्णय घेतला आहे.
या केंद्रांचा प्रस्ताव तयार करून तो भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मंजुरीनंतर जिल्ह्यात एकूण ३३४२ केंद्रे होणार आहेत. सर्वाधिक केंद्रे ही इचलकरंजी व शिरोळ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी आठ होणार असून कागल व कोल्हापूर उत्तरमध्ये प्रत्येकी दोन, कोल्हापूर दक्षिणमध्ये एका केंद्राचा समावेश आहे.
मतदान केंद्रांच्या नावात अन ठिकाणात होणार बदलमहापुरामुळे मतदान केंद्रे बाधित होऊन ती पडणे, मोडकळीस येण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही केंद्रे ही दुसऱ्या मजल्यावर असून, ती पहिल्या मजल्यावर घेण्याबाबत विचार सुरू होता.
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी अशा नुकसान झालेल्या मतदान केंद्राचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने ठिकाण बदलण्याचे ६१ प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रांच्या नावात बदल करावयाच्या १४ केंद्रांचा प्रस्तावही पाठविला आहे.विधानसभा मतदार संघ मतदान केंद्रे (सध्या) सहाय्यकारी केंद्रे (प्रस्तावित) एकूण मतदान केंद्रेचंदगड ३७६ -- ३७६राधानगरी ४२३ -- ४२३कागल ३५१ ०२ ३५३कोल्हापूर दक्षिण ३२२ ०१ ३२३करवीर ३५१ -- ३५१कोल्हापूर उत्तर ३०९ ०२ ३११शाहूवाडी ३३२ -- ३३२हातकणंगले ३३० -- ३३०इचलकरंजी २४६ ०८ २५४शिरोळ २८१ ०८ २८९एकूण ३३२१ २१ ३३४२