शिरोळ : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सोमवार (दि. १०) पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. दरम्यान, शुक्रवार (दि. १४) अक्षय तृतीया व रमजान ईद सण असल्याने नागरिकांना खरेदीची गैरसोय लक्षात घेता लॉकडाऊनमध्ये सुधारणा करून आज गुरुवारी एक दिवस सकाळी सहा ते बारा या वेळेत अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे कोविड नियमांचे पालन करून व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवावीत, असे आवाहन पालिकेने केले आहे.
रमजान ईद व अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यवहार आज गुरुवारी एकच दिवस सकाळी सहा ते बारा या वेळेत सुरू राहणार आहेत. भाजीपाला व फळविक्री बाजार विजयसिंहनगर व बुवाफन मंदिर परिसरात भरविला जाणार आहे. भाजी-फळ विक्रेते यांनी नगरपरिषदेने दिलेल्या जागेवर बसून विक्री करावयाची आहे. शुक्रवारपासून १९ मेपर्यंत कडक लॉकडाऊन कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करुन पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी यांनी केले आहे.