कोल्हापूर : मुंबईतील ‘हॉटेल ताज’वर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ल्याला सोमवारी (दि. २६) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, अन्य पोलीस व नागरिक यांना मानवंदना देण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि देशात शांतता राहावी म्हणून ‘स्टॉप टेरेरिझम’ हा संदेश घेऊन कोल्हापूरमधील केदार विजय साळुंखे (वय सहा) हा चिमुकला सांगली ते कोल्हापूर हे ५५ किलोमीटरचे अंतर स्केटिंग रॅलीद्वारे पूर्ण करणार असून, तो या दिवशी विश्वविक्रम आहे. याबाबतची माहिती अमॅच्युअर कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग अकॅडमीचे प्रा. महेश कदम व अमोल कोरगावकर, स्वाती गायकवाड (साळुंखे) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
सांगलीतील शहीद अशोक कामटे चौक, विश्रामबाग येथून पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ६.३० वाजता केदार स्केटिंग उपक्रमास सुरुवात करणार आहे. तो सकाळी १०.३० वाजता कोल्हापूरमधील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचणार आहे. तो ५५ किलोमीटरचे अंतर चार तासांत पूर्ण करणार आहे. या ठिकाणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापौर शोभा बोंद्रे, आदींंच्या उपस्थितीत स्वागत केले जाणार आहे. यावेळी सर्व मान्यवरांतर्फे शहिदांना मानवंदना व श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. याच वेळी त्याच्या या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे व त्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.
या विक्रमाची नोंद एशिया पॅसिफिक बुक आॅफ रेकॉर्ड, नॅशनल बुक आॅफ रेकॉर्ड आणि चाइल्ड बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड (ग्लोबल) यांमध्ये होणार आहे. केदार हा विबग्योर हायस्कूल, कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत असून, तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळुंखे व पोलीस उपअधीक्षक स्वाती गायकवाड-साळुंखे यांचा मुलगा आहे. या उपक्रमास कोरगावकर ट्रस्ट, रग्गेडियन, यश फाउंडेशन, डीएजी रायडर्स यांचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अमॅच्युअर कोल्हापूर रोलर स्केटिंग अकॅडमीचे अध्यक्ष अनिल कदम यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेस यावेळी टी. बालन उपस्थित होत्या.