कोल्हापूर : दौलतनगर परिसरातील गुंड चिन्या उर्फ संदीप अजित हळदकर (वय २५) याचा १२ जणांनी पाठलाग करून यादवनगरात दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी सहा तरुणांना अटक केली, आणखी एकाचे नाव निष्पन्न झाले असून त्याचा शोध सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा दारूच्या नशेत दोन महिलांना चाकूचा धाक दाखवल्यानंतर संतप्त जमावाने त्याचा खून केल्याचे उघड झाले.अटक केलेल्यांची नावे, महेश मधुकर नलवडे (२३, रा. सायबर चौक), अभिषेक राजेंद्र म्हेत्तर (२२), रोहन कृष्णात पाटील (२४), शुभम दीपक कदम (२२), अजय संजय कवडे (२८), सुधीर तुकाराम मोरे (२१, पाचही रा. दौलतनगर). तर दादू पवार (रा. दौलतनगर) हा संशयित पसार आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुंड चिन्या हळदकर याच्या गुन्हेगारीला दौलतनगरमधील नागरिक वैतागले होते. शनिवारी रात्री अकराला त्याने गांजा व दारूच्या नशेत दौलतनगर परिसरात घरांच्या दारावर लाथा मारल्या, रिक्षाची मोडतोड केली, महिलांच्या अंगाला चाकू लावून दहशत माजविली. या कृत्यामुळे संतप्त तरुणांची त्याच्याशी वादावादी झाली. एका महिलेने तक्रारीसाठी राजारामपुरी पोलिसांकडे धाव घेतली. तरुणांशी वाद वाढल्याने तो पळून गेला.
सारेच एकदम तुटून पडले
पळणाऱ्या गुंड चिन्याचा तरुणांनी पाठलाग करून यादवनगरातील महावितरण कार्यालयाशेजारी गाठले. त्याच्यावर सर्व जण तुटून पडले. भर रस्त्यातच अक्षरश: दगड-विटांनी ठेचून, चाकूने भोसकून त्याचा जागीच खून केला. त्यानंतर हल्लेखोर पळाले. शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, तानाजी सावंत, राजेश गवळी आदींनी घटनास्थळी भेट देत हल्लेखोरांची शोधमोहीम घेतली. सहा संशयित हल्लेखोरांना रविवारी पहाटे अटक केली. त्यांना न्यायालयाने बुधवारपर्यत (दि.२८) पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, दौलतनगरात पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
पोलीस ठाण्यासमोर गर्दीसंशयितांच्या अटकेनंतर त्यांच्या नातेवाइकांनी पहाटे सहा वाजता राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोर गर्दी करून आरोपींना सोडविण्याची मागणी केल्याने वातावरण तंग बनले होते.
चिन्यावर १४ गुन्हे, भाऊ शुभमला मोका
गुंड चिन्यावर खुनाचा प्रयत्न, चोरी, मारहाण, विनयभंग, जबरी चोरी आदी सुमारे १४ गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत. २६ ऑगस्टला तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता, सध्या नवरात्रोत्सवात त्याच्यावर स्थानबद्दतेची कारवाई केली होती. त्याचा भाऊ शुभम याच्यावरही गंभीर गुन्हे दाखल असून सध्या तो मोका कारवाईखाली कारागृहात आहे.